अचलपूर : जिल्ह्यातील बाल विवाहाचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले. शुक्रवारी पुन्हा अचलपूरमध्ये १५ वर्षीय बलिकेचा विवाह रोखण्यात आला.
सदर बालविवाह २६ एप्रिल रोजी होत असल्याची तक्रार बाल संरक्षण कक्ष आणि अचलपूर पोलिसांना मिळाली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांच्या आदेशानव्ये जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले आणि बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांनी चाईल्ड लाईनचे अमित कपूर व अजय देशमुख यांच्यासमवेत अचलपूर गाठले. येथील पोलीस ठाण्यामधून मदत घेऊन वधुपक्षाकडे जाऊन मुलीच्या आई-वडिलांसोबत वरपक्षाची बैठक घेण्यात आली तसेच त्यांच्याकडून मुलीचे १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले. विवाह केल्यास गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची तंबी देण्यात आली.
अचलपूर पोलीस ठाणे, बाल संरक्षण कक्ष, अमरावती व चाईल्ड लाईन प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुलींचे अल्पवयात विवाह होऊ नये, याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी कर्मचारी कठोर मेहनत घेत आहेत. सातत्याने संबधित स्टेक होल्डरसोबत संपर्कात आहेत. यामुळेच बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश येत असल्याचे मत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वीच मोर्शी तालुक्यात दोन बहिणींचे बालविवाह रोखण्यात आले.