जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पाटबंधारे विभागाने केली पाहणीअमरावती : सावरखेडजवळ पेढी नदीच्या जिवघेण्या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या शिकस्त पुलामुळे ‘महाड’ येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. या ‘लोकमत’च्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गंभीर दखल घेत पाटबंधारे विभागाला तत्काळ पाहणी करण्याचे निर्देश दिले व पाहणीअंती झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. वलगावपासून चार किलोमीटर अंतरावर सावरखेड येथे जाण्यासाठी असलेल्या पेढी नदीवरच्या पुलाच्या चवथ्या कमानीची दगडांची भिंत खचली आहे. अमरावती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पगारे व कार्यकारी अभियंता शरद तायडे यांनी शुक्रवारी सकाळी या पुलाची पाहणी करून वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांना विषद केली. यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या गावाला अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले. सावरखेड येथे येणाऱ्या मार्गाची दुरूस्ती जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग करणार आहे, असे ते म्हणाले. यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशोर साकुरे यांच्याशी संपर्क साधला असता पाटबंधारे विभागाचा याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त नसल्याचे त्यांनी सांगितले. निम्नपेढी प्रकल्पात पाच गावे पूर्णत: व २ गावे अंशत: बुडित क्षेत्रात आहेत. त्यापैकी सावरखेड हे गाव अंशत: बुडित क्षेत्रात आहेत. या गावातील ४०० घरांपैकी केवळ खोलगट भागातील ४० ते ५० गावे बुडित क्षेत्रात आहे.अंदाजपत्रकास मान्यता नसल्याने पुलाची दुरुस्ती करु शकत नाही. शुक्रवारी पुलाची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली व वाहतूक बंद करण्याचा निर्णय दिला.- शरद तायडे, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, पाटबंधारे विभाग
‘त्या’ पुलावरील वाहतूक बंद
By admin | Updated: August 5, 2016 23:55 IST