चांदूरबाजार : शहरातील बेलोरा मार्गवरील वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याच्या कार्यालयात प्रकाश व्यवस्थेकरिता विद्युत खांबावरून थेट आकोडा टाकून वीज कनेक्शन घेण्यात आले आहे. एकीकडे ग्राहकांना नियमांचे धडे देणाऱ्या महावितरणला हा दिव्याखालचा अंधार दिसत नाही काय, असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत.एकीकडे महावितरण कंपनीद्वारे वीज चोरट्यांवर कडक कारवाई केली जाते, त्यांना दंडितही केले जाते. मात्र, महावितरण कंपनीला स्वत:ला हे नियम लागू नाहीत काय, असा प्रश्न उद्भवत आहे. बेलोरा मार्गावरील महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रात काही महिन्यांपासून अनधिकृतरीत्या वीजपुरवठा सुरू आहे. या कार्यालयात लावलेल्या मर्क्युरी लाईटची विद्युत जोडणी थेट विद्युत खांबाच्या मुख्य वाहिनीवर आकोडा टाकून घेण्यात आली आहे. शहरातील पथदिव्यांकरिता विद्युत वाहिनीवरून वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांच्या कार्यालयात थेट लाईटची जोडणी केली आहे. अनेक दिवसांपासून वीज थेट विद्युत वाहिनीकरिता जोडणी केल्याने या वीज चोरीवर महावितरणतर्फे कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबाबत महावितरणचे सहायक अभियंता बन्नोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)ग्राहकांना दंड, कंपनीला मुभावीज चोरी पकडल्यास सामान्य ग्राहकाला दंड ठोठावण्याचे अधिकार महावितरण कंपनीला आहे. वेळेवर दंड न भरल्यास ग्राहकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे आता अशीच कारवाई महावितरणच्या या तक्रार निवारण केंद्रावर होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महावितरणच्या तक्रार केंद्रावर चोरीची वीज
By admin | Updated: March 31, 2017 00:16 IST