तिवसा शाखेचा प्रताप : महिला शेतकऱ्याला कर्ज देण्यास नकारअमरावती : प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी कर्ज तातडीने उपलब्ध करावे, असे शासनाचे निर्देश असताना शासनाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार तिवसा येथील स्टेट बँक शाखेत सुरू आहे. एका महिला शेतकऱ्याची छोट्या ट्रॅक्टरसाठी ३ लाखाची लोणकेस कृषी विभागाने मंजूर करून बँकेकडे पाठविले असता व्यवस्थापकांनी एसबीआय लाईफ इन्शूरन्सची वार्षिक २५ हजार ५०० रुपयाची विमा पॉलीसी काढल्याशिवाय कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी तिवसा शाखेत घडला. तिवसा येथील महिला शेतकरी जयश्री प्रदीपराव वानखडे यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात फलोत्पादन यांत्रिकीकरण या घटकांचा सन २०१५-१६ या वर्षामध्ये लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे ११ सप्टेंबरला अर्ज सादर केला होता. यांचे शेत तिवसा येथे असल्याने कृषी विभागाने त्यांना तिवसा येथील स्टेट बँक शाखेत छोट्या ट्रॅक्टरची खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपयांच्या कर्जासंदर्भात वाढविले. याबाबत त्यांचे चिरंजीव विक्रांत वानखडे यांनी व्यवस्थापकाची भेट घेतली असता त्यांनी कर्ज मंजूर करतो. परंतु यासाठी वार्षिक २५ हजार ५०० रुपयांची एसबीआय लाईफ इन्शुरन्स पॉलीसी काढण्याची सक्ती केली. ही पॉलीसी काढल्याशिवाय कर्ज देण्यास नकार दिला. विक्रांत वानखडे यांनी व्यवस्थापकास विनंती करून विम्याची सक्ती करता येणार नाही तसेच आपण बँकेचे नियमित खातेदार असल्याचे सांगितले. मात्र व्यवस्थापकाने विमा काढावाच लागेल असे स्पष्ट करीत महिला शेतकऱ्याला कर्ज देण्यास नकार दिला असल्याचा आरोप विक्रांत वानखडे यांनी केला. याबाबत व्यवस्थापक माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
कर्जासाठी स्टेट बँक विम्याची सक्ती
By admin | Updated: September 13, 2015 00:16 IST