अमरावती : सध्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याची मोहीम जोरात सुरू आहे. या बदली प्रक्रियेत जिल्ह्याचे मिनी मंत्रालयातील अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे.ही रिक्त पदे भरण्या ऐवजी लागोपाठ जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे बदल्यामुळे आऊट गोईग सुरू आहे.मात्र एखादा अपवाद सोडला तर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे जणूकाही इन कमिंग बंद असल्याचे चित्र बदल्याच्या प्रक्रियेत दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी,डीआरडीएचे प्रकल्प संचालकांचे पद कित्येक वर्षापासून रिक्त आहे.याशिवाय बांधकाम, पाणी पुरवठा, जलसंधारण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कृषी विकास अधिकारी आदी महत्वाच्या अधिकाऱ्यांची पदेही बदली व सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. असे असतांना ही पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधी अन सीईओंनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. मात्र याची दखल घेतली गेल्याचे रिक्त पदावरून दिसून येते. पदे भरली जात नसल्याने अतिरिक्त प्रभारावर मिनिमंत्रालयाचा गाडा किती दिवस हाकलायचा हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पदभार दिला तर त्या अधिकाऱ्यांचेही त्याच्या मुळ जबाबदारीकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत अलिकडेच जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांची बदली झाली.त्याच्या रिक्त पदावर नवे डेप्युटी सीईओ म्हणून कैलास घोडके रूजू झाले.हा अपवाद सोडला तर अन्य बदल्यामध्ये सिंचन विभागातील अनेक उपअभियंत्याच्या बदल्या इतरत झाल्यात.हे अधिकारी बदलीचे ठिकाणी रूजू झाले.मात्र त्याच्या रिक्त जागेवर बदलीेवर आलेल्यापैकी काही जण अद्यापही रूजू झाले नाहीत. अतिरिक्त सीईओ,प्रकल्प संचालकाचेही पद रिक्त आहे. याशिवाय बीडीओ, उपअभियंता आदी पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची डझनावर पदे रिक्त असताना बदलीत आऊट गोईंग वाढले, मात्र रिक्त पदावर इनकमिंग होत नसल्याने जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचा रिक्त पदांचा अनुशेष केव्हा भरून काढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
सावळकर, बाबरे, खेडकर यांचीही बदली
पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांची यवतमाळ येथे बदली झाली. याशिवाय अचलपूरचे बीडीओ जयंत बाबरे यांची चिखलदरा पं.स.,तर नांदगाव खंडेश्वरचे बीडीओ विनोद खेडकर यांची बदली अंजनगाव सुर्जी येथे समकक्ष पदावर झाली आहे.