राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता कनिष्ठ महाविद्यालयांनी ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यादरम्यान १४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक ज्युनियर कॉलेजमध्ये सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत अपलोड केल्यानंतर मंडळस्तरावर अंतिम निकाल तयार केला जाणार आहे. गुण ऑनलाईन अपलोड केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय येथे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहे. दहावीच्या गुणांची ३० टक्के, इयत्ता अकरावीच्या गुणांची ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाची ४० टक्के यावर बारावीचा अंतिम निकाल आधारलेला राहणार आहे. दहावीच्या वर्षाच्या गुणांचे वेटेज लक्षात घेता, सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत.
कोट
वरिष्ठ स्तरावरून आलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळास्तरावर इयत्ता बारावीच्या मूल्यमापनाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. १४ जुलैपासून ही प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे.
- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ