अमरावती : आयुष्यात पैसे किती कमविले यापेक्षा आनंद किती कमविला याचीच मोजदाद महत्त्वपूर्ण ठरते. संयमी आणि मधुर वाणीमुळे माझ्या यशस्वीतेची गती दुप्पट होऊ शकली, असे विनम्र प्रतिपादन शैलेश वानखेडे यांनी केले.एकवीरा देवस्थानचे सचिव आणि अमरावती शहराच्या नवनिर्माणात अग्रणी स्थानी असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायी शैलेश वानखेडे म्हणतात, माझा शत्रूही आला तरी मी त्यांच्याशी हसूनच बोलतो. बोलण्यामुळे एकही शत्रू निर्माण होऊ नये, हा कटाक्ष मी पहिलेपासूनच पाळत आलो आहे. प्रचंड रागात कुणी आलेच तर त्यांचे बोलणे मी नीट ऐकून घेतो. शांतपणे आणि हळू आवाजात त्यांच्याशी संवाद साधतो. माझ्या या क्रियेला हमखास प्रतिसाद मिळतो. समोरच्या व्यक्तीच्या स्वराची उंची कमी होऊ लागते. एकदा की ती व्यक्ती हळू आवाजात बोलली की, अहंकार निवळत जातो नि संवादास सुरुवात होते. ९० टक्के समस्या तेथेच निकाली निघते. समस्या सुटली की माणूस जोडला जातो. हे सूत्र आता माझी जीवनपद्धतीच झाली आहे. विनोदाने मला काही मित्र म्हणतात, 'गोड बोलण्याने डायबिटीज होईल'; परंतु गोड बोलणे हा आनंदनिर्मितीचा झरा आहे, याची प्रचिती मला आली आहे. गोड वाणीचा तोटा नाही, आहे तो लाभच.व्यक्ती व्यावसायिक मूल्याची असो अगर नसो, घरी राबणारा कामगार असो वा तुमच्या संसाराची राणी, वाणी गोड असेल तर त्या व्यक्तीसोबतच्या संवादातून निर्माण होईल तो निखळ आनंदच. या पद्धतीने प्रत्येकजण तुमच्यासोबत जोडला जाईल. तीच तुमची शक्ती, असे सूत्र शैलेश वानखेडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.
संयमी, मधुर वाणी आनंदनिर्मितीचा झरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:44 IST
आयुष्यात पैसे किती कमविले यापेक्षा आनंद किती कमविला याचीच मोजदाद महत्त्वपूर्ण ठरते. संयमी आणि मधुर वाणीमुळे माझ्या यशस्वीतेची गती दुप्पट होऊ शकली, असे विनम्र प्रतिपादन शैलेश वानखेडे यांनी केले.
संयमी, मधुर वाणी आनंदनिर्मितीचा झरा !
ठळक मुद्देशैलेश वानखेडे : ९० टक्के समस्या सुटतात