अमरावती : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २८५ गावांतील कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी दिले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार रमेश बुंदिले, आमदार अनिल बोंडे, प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेत २८५ गावांचा समावेश असून त्यासाठी २१० कोटी रूपयांचा आराखडा केलेला आहे. प्रत्येक प्रकल्प आराखड्यात गावकऱ्यांनी सुचविलेली कामे घेण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक मुळे यांनी दिली. आराखड्यानुसार ७७ गावांत १५५ कामे सुरू आहेत. यावर कामाची गती कशी वाढवता येईल व यासंदर्भातील अडचणींची पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. मार्चपर्यंत २० कोटी ४७ लक्ष रुपयांचा निधी या अभियानासाठी उपलब्ध असून जून २०१५ पर्यंत ८९.५९ कोटी मिळतील. जलयुक्त शिवार अभियानामध्ये नव्याने हाती घ्यावयाची कामे, अस्तित्वातील जलस्त्रोतांची दुरूस्ती, बळकटीकरण याच्याशी संबंधित ३८१ कामांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचे संगणकीय सादरीकरण केले.कृषी विभाग, जलसंधारण, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण, महसूल या यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची सूचनादेखील पालकमंत्र्यांनी केली. या अभियानात गावनिहाय कामांची संख्या व यादी देण्याचे तसेच २० मार्चपूर्वी सिमेंट नाला बांधाच्या कामाचे निविदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.कृषी विभागाच्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. यामध्ये गेल्या १० वर्षांतील पिकनिहाय उत्पादकता, हवामान आधारित पिक विमा योजना, फळपिक विमा योजना, शेतकऱ्यांना मदत वाटप या संबंधीची विस्तृत माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मुळे यांनी पालकमंत्र्यांना दिली. कृषी विभागामध्ये २६६ पद रिक्त आहेत व वाहने उपलब्ध नसल्याने योजना राबविण्यात अडचण येत असल्याचे मुळे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. कृषी विभागाने जलयुक्त शिवार अभियानात कोणत्याही उणिवा न ठेवता हे अभियान यशस्वी करण्याकरिता स्वत:ला झोकून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. (प्रतिनिधी)
‘जलयुक्त शिवार’च्या कामांना गती द्या
By admin | Updated: March 15, 2015 00:44 IST