अमरावती : शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी व आवश्यक कृषी निविष्ठांच्या वाहतुकीसाठी चांगले रस्ते असावेत, यासाठी जिल्ह्यात पांदण रस्त्याचे विशेष मॉडेल राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी दिली.
चांगले पांदण रस्ते नसले तर शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यास त्रास होतो. पावसाळ्यात हा त्रास आणखीच वाढतो. शिवाय, निविष्ठा पोहोचविण्यासाठीही अडथळे येतात. हे लक्षात घेऊन पांदण रस्ते योजनेचे अमरावती जिल्ह्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणण्यात येणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कन्व्हर्जनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा नियोजन, मनरेगा, जिल्हा परिषद, आमदार निधीतूनही अधिकाधिक कामे राबविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
कठोरा येथे कठोरा-नवसारी पांदण रस्ता, कठोरा ते दहिकर यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता, कठोरा ते टाकळी ई-क्लास चांदूर बाजार शिवरस्ता कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या करण्यात आले. सालोरा येथील सालोरा बु. ते आमला शिवपांधण रस्ता, सालोरा बु. ते पेढी नदीपासून राजगौरीधर यांच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. पुसदा येथील पुसदा ते शिवपांधण रस्ता, पुसदा ते जऊळका पांदणरस्ता, पुसदा ते भूगाव पांदण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. नांदुरा लष्करपूर येथील चोपण नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण आणि नांदुरा लष्करपूर ते सरमस्ताबाद पांदण रस्त्याचे कामे लवकरच सुरु होऊन पूर्णत्वास जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बॉक्स
डोह खोलीकरणाला चालना
गोपाळपूर येथील पेढी नदीच्या डोहाच्या खोलीकरणाच्या कामामुळे पाणीसाठ्यात सुधारणा होऊन परिसरात भूजल संवर्धनासही मदत होणार आहे. गोपाळपूर-आमला पांदण रस्ता, गोपाळपूर-पेढी नदी ते महाजनवाडी पांदण रस्ता, गोपाळपूर पिंप्री ते पेढी नदीपर्यंत पांदण रस्ता, गोपाळपूर ते हिरापूर पांदण रस्त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.