अमरावती : आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता शेतकर्यांच्या तक्रारींची दखल घेण्याकरिता राज्यातील सोयाबीन उत्पादनासाठी जिल्ह्यात विशेष सनियंत्रण कक्ष स्थापन करावेत, असे आदेश प्रधान कृषी सचिव सुधीरकुमार गोयल यांनी दिल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
सोयाबीन कापणीच्या कालावधीतच झालेल्या अतवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी सोयाबीन बिजोत्पादन प्रक्षेत्राचे अतवृष्टीमुळे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवणशक्ती कमी झाल्याचा अहवाल महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांना सोयाबीन बियाणे टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. व्यापार्यांकडून सोयाबीन साठेबाजी होणे, अनेक ठिकाणी बोगस बियाणे विक्रीसारखे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.