पावसाची दडी : परप्रांतीय शेतकऱ्यांनी फिरवली पाठसंजय खासबागे वरुडयंदा समाधानकारक पाऊस पडल्यास संत्रा कलम उत्पादकांना सुगीचे दिवस येतील, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांचा व्यवसाय मोडीत निघण्याची शक्यता असून संत्रा कलम उत्पादकांचे हिरवे स्वप्न भंगले आहे.शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी ईडलिंबापासून काढलेल्या बियांमधून तयार केलेल्या जंभेरी नावाच्या रोपट्यावर कलमा चढवितात. राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रात या संत्रा कलमांना अधिक मागणी असते. १८ महिन्यांचे उत्पादन असलेल्या संत्रा, मोसंबीसह लिंबुवर्गीय कलमांची रोपे लावल्यांनतर त्यावर सहा महिन्यानंतर डोळे चढविले जातात. ही प्रक्रिया नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत चालते. नर्सरीधारक डोळे चढविलेल्या कलमांची मशागत करुन त्या कलमा वाढवितात. हे रोपटे ८ ते ९ इंच अंतरावर शेतात लावले जाते.त्यावर दोन ते ३ वर्षे वयाच्या संत्रा झाडावरील डोळा(कलम) काढून ते या रोपटयावर चढविले जाते. जंभेरीच्या रोपटयावर संत्र्याकरिता रंगपूर लाईम, मोसंबीकरीता न्यूसेलर, हैदराबादी, गावरानी अशा जातींच्या कलमा चढविल्या जातात. जून महिन्यापासून या कलमांची जोपासना केली जाते.या कलमांची वाढ होऊन त्या विक्रीस उपलब्ध होईपर्यंत साधारणत दीड वर्षाचा (१८ महिने) कालावधी लागतो. अशा पध्दतीने संत्र्यासह लिंंबुवर्गीय कलमांची शास्त्रोक्त पध्दतीने निर्मिती होते. संत्रा कलमा तयार करण्याकरिता १२ ते १५ रुपयांचा खर्च येतो. यावर्षी संत्र्यासह लिंंबुवर्गीय कलमांचे सुमारे दीड ते दोन कोटींच्या घरात उत्पादन आहे. कृषी विभागातर्फे डीएनए चाचणी करुनच संत्रा, मोसंबी आणि लिंंबुवर्गीय कलमांचे उत्पादन केले जाते. कलमांच्या खरिदीसाठी राजस्थान, मध्य प्रदेशसह देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येथे येतात. विविध राज्यांच्या कृषी विभागाच्यावतीने सुध्दा येथून परवान्यावर कलमांची खरेदी केली जाते. यातून जून ते सप्टेंबरपर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल या भागात होते. तालुक्यात २७५ परवानाधारक नर्सरीधारक असून तेवढेच विनापरवाना संत्रा कलमा निर्मिती करणारे आहेत. २० आर. पासून तर ४०-५० आर. जमिनीवर लागवड केली जाते. २० आर. जमिनीवर ३५ हजार कलमा तयार होतात. यावर्षी दीड ते दोन कोटी संत्रा कलम निर्मितीचे काम नर्सरीधारक करीत आहेत. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकीक मिळविलेल्या वरुड तालुक्यावर नैसर्गिक व कृत्रिम संकट सातत्याने कोसळत आहे. यावर्षीसुध्दा नोव्हेंबर अखेरपासून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जंभेरीच्या रोपट्यावर संत्र्यांचा डोळा लावण्याचे काम झाले. जेमतेम लावलेल्या डोळयाने (बडिंग) अंकुरणे सुरु केले होते. अनेक अडचणींवर मात करुन जीवापेक्षाही अधिक जपणूक केल्यानंतर संत्रा कलम तयार होऊन विक्रीस उपलब्ध होते. गत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात गारपीट व वादळाने थैमान घातल्याने जंभेरीवर लावलेले संत्र्यांचे डोळे खचले आहेत.संत्रा, लिंबूवर्गीय कलमांना नुकसानभरपाई का नाही ? गारपीट आणि वादळी पावसामुळे नुकत्याच अंकुरलेल्या कलमांचे डोळे (बडींग) खचल्यामुळे कलम खराब झाली. पुन्हा ती कलम उपयोगात येणे शक्य नसल्याने नर्सरीधारकांना लाखो रुपयाचा फटका बसला. तरीही शासनाने याकडे डोळेझाक केली. संत्रा, गहू, हरभरा, सोयाबीन उत्पादकांना नुकसानभरपाई दिली. मग, संत्रा-लिंबूवर्गीय कलमांना नुकसानभरपाई का नाही, असा सवाल नर्सरीधारकांनी केला आहे. २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने संत्रा कलमा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट आहे. समाधानकारक पाऊस आल्यास संत्रा कलमा उत्पादकांना सुगीचे दिवस येणार असून भाव सुध्दा चांगला मिळेल. गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने मागणी वाढेल आणि दरही वधारतील. निसर्गाची कृपादृष्टी झाल्यानंतर परप्रांतीय खरेदीदार आणि राज्यातून शेतकरी आले तरच नर्सरीधारकांना त्याचा पुरेपूर लाभ मिळेल. उध्दव फुटाणे उध्दव नर्सरी, संचालकनिसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे कोटयवधीचा संत्रा कलमांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. हजारो हातांना काम देणारे नर्सरीधारकही वाऱ्यावरच आहेत.-मोहन तांबी, संत्रा कलम उत्पादक शासन नर्सरीधारकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे. देशातील कानाकोपऱ्यात संत्रा कलमा पोहोचविणारा एकमेव परिसर शेंदूरजनाघाट आहे. परंतु ूयाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ५० टक्के नुकसान होऊनही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. संत्रा कलमांचा यावर्षी तुटवडा पडण्याची शक्यता असून परप्रांतात जाणाऱ्या कलमा सुध्दा मंदावल्या आहे.यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात.- जयप्रकाश भोंडेकर, नर्सरीचालक
संत्रा कलमांच्या व्यवसायावर अवकळा
By admin | Updated: July 9, 2015 00:15 IST