परतवाडा : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी अचलपूर व चांदूर बाजार या दोन्ही तालुक्यांचा आढावा घेतला. अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीदरम्यान दोन्ही तालुक्यांतील बी-टेन, अतिक्रमण नियमानुकूल करणे, पाणीपुरवठा, पांदण रस्त्यांची समस्या सोडविण्याचे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चोख राबविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
अचलपूर शहरातील नगर परिषद क्षेत्रातील शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या साडेतीन हजार नागरिकांपैकी दोन हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, एक हजार नागरिकांकरिता जागा नियमानुकूल प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी ‘लोकमत’ला दिली. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार मदन जाधव धीरज स्थूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे उपस्थित होते.
अचलपूर मतदारसंघातील ग्रामीण भागात ८३ गाव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले असून, १०५ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी दीडशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे अचलपुरातील २४ गावे पाणीपुरवठा व चांदूर बाजारातील १९ गावे पाणीपुरवठा योजनेचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
बॉक्स
बी-टेन जागेचे ‘ए’ करण्याचे अधिकार एसडीओंना
अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांसह ग्रामीण भागात तीन हजारांपेक्षा अधिक प्रकरणे बी-टेन (ब सत्ता प्रकार) जागेची आहेत. नझूल जमिनीचे अ सत्ता प्रकारामध्ये प्राधान्याने बदल करणे या बाबीला प्रथम प्राधान्य दिले जाणार असून, त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना त्यासंदर्भात अधिकार दिले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील बी-टेन जागेचा वाद मिटणार असून, नागरिकांना न्याय मिळणार आहे.
अचलपूर शहरातील गांधी पुलावर विकासात्मक आणि सौंदर्य करण्याच्या दृष्टीने ३० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
------