रोहितप्रसाद तिवारी - मोर्शीपिंपळखुटा मोठा येथील फुटलेल्या जलवाहिनीमुळे जवळपास १२ ते १५ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरूवारी सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तलाठ्याच्या सहकार्याने घटनास्थळाची पाहणी केली. शिवाय नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही त्यांनी संतप्त गावकऱ्यांना दिले. बुुधवारी तहसीलदार विजय माळवी यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. परंतु तहसीलदारांनी वाहनातून उतरण्याचे सौजन्यसुध्दा दाखविले नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्यादरम्यान पिंपळखुटा (मोठा) गावातून गेलेली सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाची जलवाहिनी पाण्याच्या प्रचंड दाबामुळे फुटली. स्फोटसदृश आवाजासह पाण्याचा मोठा प्रवाह प्रचंड वेगाने वाहू लागला. जि.प. उर्दू शाळा आणि विवेकानंद विद्यामंदिर परिसरात पाणी शिरल्याने मोठी हानी झाली. शाळेला सुटी देण्यात आली. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे गावातील रस्ते खरडून निघाले. अनेक शेतकऱ्यांचे शेणखताचे ढिगारे वाहून गेले, एका शेतकऱ्याचे गव्हाचे शेत पाण्याखाली आले.
सोफियाची जलवाहिनीच निकृष्ट
By admin | Updated: February 5, 2015 23:00 IST