कामकाज ठप्प : दूरध्वनी, इंटरनेट सेवेअभावी संपर्क तुटला
जितेंद्र दखने - अमरावती राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने कोट्यवधी रूपये खर्चून उभारण्यात आलेली सामाजिक न्याय भवनाची इमारत सध्या संपर्क कक्षेच्या बाहेर आहे. पोलीस आयुक्तालयाच्या मागे असलेल्या या भव्य वास्तूमध्ये समाविष्ट विविध शासकीय महामंडळे व सामाजिक न्याय विभागाचा कार्यभार दूरध्वनी सेवा, इंटरनेट सुविधेविनाच सुरू आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून या विभागाचा शासनाशी संपर्कच तुटलेला आहे. सामाजिक न्याय विभागाने जिल्हास्तरावर कोट्यवधी रूपये खर्चून प्रशासकीय इमारत उभारली. यातून शासनाने ‘इमारत एक कार्यालय अनेक’ ही नवी संकल्पना अस्तित्वात आणली. शहरातही विस्तीर्ण इमारत आकारास आली आहे. शासनाने इमारतीत आवश्यक सोयी सुध्दा उपलब्ध करून दिल्या आहेत. वीज, पाणी, प्रसाधनगृह, प्रशस्त हॉल, पार्किंग सुविधा येथे उपलब्ध आहे. शहरात विखुरलेल्या आणि भाड्याच्या इमारतीत सुरू असलेले विविध कार्यालये याठिकाणी स्थानांतरित करण्यात आले. त्यात प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त कार्यालय, विशेष समाज कल्याण विभाग, विभागीय जात पडताळणी कार्यालयासोबतच विविध महामंडळाच्या कार्यालयांचा समावेश आहे. परंतु या इमारतीमधील दूरध्वनी व इंटरनेट सेवा गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने या न्याय भवनाचा शासनासोेबत संपर्कच नाही.