सांडपाण्यातील लिकेज पाईपमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ
पथ्रोट : शहानूरच्या पाणीपुरवठा पाईप लाईनमधून घराघरांत पोहोचणाऱ्या पाण्यात आता सापाची पिल्ले निघत आहे. सदरचा प्रकार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांडपाण्यातील पाण्यात असलेल्या शुद्ध पिण्याच्या पाईपमध्ये वारंवार लिकेज निघत असल्यामुळे सदरचा प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू झाला आहे.
२६ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल गिल्डा हे शहानूरवरून आलेल्या नळ पुरवठ्यामधून पिण्याचे पाणी भरत असताना त्यांच्या घरी सापाची छोटी पिले पाण्यातून निघाली. शहानूर धरणाचे पाणी टाकीत जमा झाल्यानंतर तेथून ज्या पाईप लाईनद्वारे पिण्याचे पाणी घरोघरी नळावाटे पोहोचते. बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पाईप सांडपाण्याच्या नालीतून टाकण्यात आले आहेत. ते लीक होऊन सांडपाण्यातील घाण लोकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांची जिवाशी खेळ सुरू आहे. अशा पाईपची दुरुस्ती करून पुन्हा ते पाईप सांडपाण्यातच टाकण्यात येत असल्याचा प्रत्यय अनेकदा अशा घटनांमधून आला आहे.
गावात पाईप लाईन टाकण्याचे काम अभियंत्यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांच्याकडून अशी चूक व स्थानिक प्रशासनाने कुठलेच पाऊल न उचलल्याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा घटनेने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
दरम्यान, जीवन प्राधिकरणचे अधिकारी वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये गेले. त्यांनादेखील मिसळकर व अखिल वर्मा यांचे घराच्या पाईप लाईनमध्ये सापाची पिले निघाल्याचे निदर्शनास आले. शहानूर धरणाचे पाणी सोडताना पाण्याच्या दबावामुळे काही ठिकाणी पाइपलाइन लीक झाली आहे. ती जोडताना हा प्रकार होत असल्याची माहिती देण्यात आली.
--------------