धोक्याची घंटा : तीन आठवड्यांपासून पावसाची दडी, पाच टक्क्यांनी घटली पाण्याची पातळी, १८ टक्के जलसाठाअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस व यंदाच्या पावसाच्या दिवसांत २३ दिवसांपासून पावसाने मारलेली दडी याचा परिणाम जाणवायला लागला आहे. १५ जुलै अखेर अमरावती विभागातील ४२० लघुप्रकल्पांत केवळ १८.५० टक्के साठा शिल्लक आहे. दिवसाच्या कडाक्याच्या उन्हात होणारे बाष्पीभवन व ५ टक्के मृतसाठा गृहित धरता लघुप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती जिल्ह्यात ७१ लघु प्रकल्प आहेत. यामध्ये १५.३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १०२ लघु प्रकल्पांमध्ये २१.२३ टक्के, अकोला जिल्ह्यातील ३५ लघु प्रकल्पांत ९.७२ टक्के, वाशीम जिल्ह्यातील ११३ लघुप्रकल्पांमध्ये १८.६१ टक्के व बुलडाणा जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पांत ७.९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. विभागातील ४२० लघुप्रकल्पांची सरासरी पाहता प्रकल्पीय संकल्पित ९०३.६४ द.ल.घ.मी. जलसाठ्याच्या तुलनेत १५ जुलैअखेर १८२.५८ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. विभागात २३ लघु प्रकल्प आहेत. यामध्ये प्रकल्पीय संकल्पीय ६५९.४७ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत सध्या २३४.३८ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. याची टक्केवारी ३५.५४ इतकी आहे. विभागात ९ मुख्य जलप्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त १३८४.५९ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत सध्या ५११.६९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. ही ३६.९६ टक्केवारी आहे. मुख्य प्रकल्पात अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये ७.८२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा २२.४२ टक्के व पेनटाकळी प्रकल्पात २०.७३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अशीच स्थिती राहिल्यास आठवड्यात काही जलप्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
लघु प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर
By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST