लक्षवेधी ; कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षाला प्रवेश द्या
अमरावती : तीन वर्षे कालावधीचा कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २०१८-१९ च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्यावतीने जिल्हाकचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कृषीमंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले.
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यामार्फत तीन वर्षे कालावधीचा कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २०१८-१९ च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्याबाबत वारंवार कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, यावर कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताची बाब लक्षात घेता त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसने केली आहे. यावेळी आंदोलनात विद्यार्थी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश ठाकरे व पदाधिकारी सहभागी झाले होते.