लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या विविध भागात पायी गस्त घालून सीपींनी गुन्हेगारांसह अवैध व्यावसायिकांच्या नाकी नऊ आणले आहेत. चार दिवस सलग ही कारवाई झाली. पाचव्या दिवशी सीपींनी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील रविनगर ते अकोली परिसराची झडती घेतली. यावेळी काही तुरळक अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, सीपींच्या गस्तीपूर्वीच बहुतांश व्यवसाय बंद झालेले आढळले. त्यामुळे सीपींच्या गस्तीची पूर्वसूचना व्यावसायिकांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी गतीने कामकाज केल्यास गुन्हेगारांवर वचक बसू शकतो. अधिनस्थ पोलीस यंत्रणेनेही गुन्ह्येविषयक कामकाज गांभीर्याने करावे, यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस आयुक्तांनी सलग चार दिवसांपासून शहरातील विविध भागात पायी गस्त घालून अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांची धरपकड मोहीम राबविली. गुरूवारी रात्री त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसत्र राबविले. काही दारूविक्रेत्यांना ताब्यात घेतले तर काही विनाक्रमाकांच्या दुचाकी जप्त केल्यात. सीपींच्या देखरेखीत रविनगर, दुर्गा विहार, दसरा मैदानामागील झोपडपट्टीची पोलिसांनी झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सीपींसह गुन्हे शाखेचे पथक, अतिशिघ्र दल साईनगर परिसरात पोहोचले. मात्र, त्यापूर्वीच सातुर्णा एमआयडीसी नजीकच्या सर्व पानटपºया व अवैध धंदे बंद झाले होेते. एरवी रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणारे हे व्यवसाय सीपींच्या गस्तीमुळे रात्री १० वाजताच बंद कसे झाले, याचे कोडे नागरिकांनाही सुटत नव्हते.सीपींनी वापरावा वेगळा ‘फंडा’सीपींच्या गस्तीपूर्वीच अवैध व्यावसायिक व गुन्हेगार सावध होत असतील तर त्यांच्यावर वचक बसू शकत नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी वेगळीच रणनिती आखणे गरजेचे आहे. सीपींनी शहरातील कोणत्याही परिसराला आकस्मिक भेट दिल्यास त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोंगळ कारभार लक्षात येऊ शकतो.वरिष्ठांच्या नावावर पोलिसांची चांदीशहरात सीपींनी सुरू केलेला ‘नाईट राऊंड’ त्यांच्या अधिनस्थ यंत्रणेसाठी लाभदायक ठरत आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या नावावर काही पोलीस अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांकडून वसुली करीत असल्याचे सीपींच्या निदर्शनास आले आहे. याप्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली असून अशा वसुलीखोर पोलिसांवर कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.
‘सीपीं’च्या नाईट राऊंडपूर्वीच ‘शटर डाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:49 IST
शहराच्या विविध भागात पायी गस्त घालून सीपींनी गुन्हेगारांसह अवैध व्यावसायिकांच्या नाकी नऊ आणले आहेत.
‘सीपीं’च्या नाईट राऊंडपूर्वीच ‘शटर डाऊन’
ठळक मुद्देगस्तीची माहिती ‘लिक’ : पोलिसांचाच वरदहस्त, गुन्हेगार अलर्ट