आठवडी बाजारही बंद, तहसीलदारांसह गटविकास अधिकारी, ठाणेदारांनी केली पाहणी
टाकरखेडा संभू : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे टाकरखेडा संभू येथे शुकशुकाट पसरला आहे. मंगळवारचा आठवडी बाजारदेखील झाला नाही. तहसीलदारांनी गावाला भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.
भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत, शिवाय मंगळवारचा असलेला आठवडी बाजारदेखील बंद ठेवण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी तहसीलदार नीता लबडे, भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश थोरात, वलगावचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी पी.एस. तिनखेडे, मंडळ अधिकारी आर.बी. चौरपगार यांनी गावाला भेट दिली. सरपंच रश्मी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव मस्के, सोनाली जामठे, ग्रामविस्तार अधिकारी अनिल चांदूरकर, पोलीस पाटील अजय मोहकर यांच्यासमवेत तहसीलदारांनी पाहणी करून नागरिकांना त्रिसूत्रीचे पालन करण्याबाबत मागदर्शन केले.
------------