चांदूर बाजार : तालुक्यातील माधान येथील ज्ञानेशकन्या संत गुलाबराव महाराज यांचा ५ ते १३ डिसेंबरपर्यंत साजरा होणारा श्रीनाम सप्ताह स्थगित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयात दरवर्षी निघणारी शोभा यात्रासुद्धा रद्द करण्यात आली.
संत गुलाबराव महाराजांची कर्मभूमी असलेल्या माधान या पितृक गावात दरवर्षी स्मृती महोत्सव व विविध धार्मिक तसेच समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शासनाने यंदा मंदिर उघडण्यास परवानगी दिली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व सामूहिक कार्यक्रमावर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली आहे. त्यामुळे संत गुलाबराव महाराज संस्थान माधान संस्थेच्या विश्वस्तांनी यावर्षीचा श्रीनाम सप्ताह कार्यक्रम स्थगित केला आहे. शासनाने मंदिर उघडण्याचे जाहीर करताच दरवर्षीप्रमाणे गुलाबराव महाराज संस्थान माधानतर्फे महाराजांचा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार निमंत्रण पत्रिकासुद्धा वाटप करण्यात आल्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आदेशानुसार संस्थानचे सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती संस्थानचे विश्वस्त साहेबराव मोहोड, माधव मोहोड यांनी ‘लोकमत’ला दिली.