अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने स्थानिक बेलपुरा येथील रहिवासी श्रीकृष्ण नामदेवराव गवई यांच्या मृत्युप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. त्यामुळे गवई कुटुंबीयांना तब्बल १७ वर्षांनंतर न्याय मिळाला असून या डॉक्टरांच्या व्यवसायावर बंदी आणावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.६ सप्टेंबर १९९७ रोजी श्रीकृष्ण गवई यांचा इर्विनमध्ये डॉ. अविनाश चौधरी व डॉ. जयश्री इंगोले यांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी भादंविच्या ३०४ (अ) अन्वये या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र न्यायालयात या डॉक्टरांविरुध्द खटला चालविण्यासाठी पोलिसांनी शासनाला परवानगी मागितली. परंतु राज्य शासनाने सतत टाळाटाळ केल्याने त्यावेळी मृताचे बंधू श्रीधर गवई यांनी उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करुन चौधरी व इंगोले यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी मागितली. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी श्रीकृष्ण गवईचे मृत्यू प्रकरण विद्यमान न्यायालयात दाखल केले. मात्र हे दोन्ही डॉक्टर धनाढ्य असल्याने न्यायालयात अनेक दिवस हे प्रकरण ताटकळत ठेवले. दरम्यान, जयश्री इंगोले यांना २०१० मध्ये सीआरपीसी २३९ च्या अंतर्गत गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्यानंतरही न्यायालयात खटला न चालविता दोषमुक्त करण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केला. एखादा प्रकरणात गुन्ह्यात समाविष्ट झाल्यानंतर पुराव्याशिवाय आरोपीस दोषमुक्त करता येत नाही, असा नियम आहे. तरिदेखील याप्रकरणी २०१२ मध्ये विद्यमान न्यायालयाने जयश्री इंगोले यांच्याविरुध्द निकाल दिला. याप्रकरणी साक्ष पुराव्यांचे समन्स साक्षीदारांना पाठविले. हे प्रकरण लांबणीवर टाकण्यासाठी या दोन्ही डॉक्टरांनी उच्च न्यायालयात या निकालाविरुध्द दाद मागितली. दरम्यान २५ लाखांच्या दिवाणी दावा दाखल केला. मात्र दिवाणी दाव्यामुळे क्रिमीनल केसचे महत्त्व संपून जाते. परिणामी मृताच्या भावाने दाव्याचे प्रकरण मागे घेत या दोन्ही डॉक्टरांना आरोपी बनविण्याचा चंग बांधला. हे प्रकरण उच्च न्यायालयात पिटीशन क्र.३५४/२०१२ नुसार सुरु राहिले. अखेर सर्व बाबी तपासून े१८/०६/२०१४ रोजी न्यायालयाने दोन्ही डॉक्टरांविरुध्द भादंविच्या ३०४ (अ) नुसार पोलीस कारवाई करु शकतात, असे आदेश दिले आहे. याप्रकरणी मृत श्रीकृष्ण गवई यांची बाजू जेमीनी कासट तर जयश्री इंगोले यांच्यातर्फे अनिल मार्डीकर मांडली. (प्रतिनिधी)
श्रीकृष्ण गवई मृत्युप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा
By admin | Updated: July 12, 2014 00:42 IST