आयुक्तांचा ‘वार’: नवाथे भुयारी मार्गाची पाहणीअमरावती : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सोमवारी कामकाजाची सुत्रे हाती घेतली. कामात अनियमितता केल्याप्रकरणी मोटर वाहन विभागाचे उपअभियंता दिलीप पडघन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एवढेच नव्हे, तर अतिक्रमण निर्मूलन पथकातील कन्हैया जयस्वाल यांची फाईल मागवून चौकशी आरंभल्याची माहिती पुढे हाती आली आहे.मागील १५ दिवसांपासून रजेवर असलेले आयुक्त गुडेवार हे परतले आहेत. पहिल्याच दिवशी कामात अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत चांगलीच कानउघडणी करुन घरचा रस्ता दाखविला जाईल, असा सल्ला दिला. दिलीप पडघन यांना काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाला स्टार बसेस संदर्भात पाच टक्के रक्कम पाठविण्यासाठी लेखा विभागाला अहवाल पाठविण्याचे सांगितले होते. परंतु मोटर वाहन विभागाने आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले नाही. ही बाब आयुक्त गुडेवार यांच्या लक्षात येताच दिलीप पडघन यांना विचारणा केली असता ते आयुक्तांचे समाधान करु शकले नाही. परिणामी आयुक्तांनी याप्रकरणी पडघन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. पहिल्याच दिवशी आयुक्तांनी कारवाईचा ‘वार’ सुरु केल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी कन्हैया जयस्वाल यांची पोलीस निरीक्षकांनी तक्रार दिल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी चौकशी आरंभली आहे. कन्हैया जयस्वाल हे सेवेत कधीपासून रुजू झालेत, याबाबतची माहिती गोळा करण्यासाठी आयुक्तांनी फाईल मागविली आहे. जयस्वाल यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाईचे संकेत आहेत. काही दिवसांपासून रेंगाळलेल्या नवाथे येथील भुयारी मार्गाच्या कामाला गतीे यावी, यासाठी आयुक्त गुडेवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान नागरिकांना ही कामे लवकर केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
पडघन यांना कारणे दाखवा; जयस्वाल यांचे फाईल मागविले
By admin | Updated: June 9, 2015 00:38 IST