अमरावती : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले असून त्यानंतर कोश्यारी यांच्या कार्यक्रमांना विरोध होत आहे. त्यातच राज्यपाल आज अमरावती येथे आले असता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला चपला दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाराष्ट्र -मध्य प्रदेश सीमा प्रश्नावर शनिवारी अमरावती येथील डाॅ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्यात महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नवीन बायपासलगतच्या मार्गाने प्रबोधिनी येथे जात असताना टर्निंग पॉईंटवर उद्वव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वाहनाच्या ताफामध्ये चपला घेऊन शिरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
असे असली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वााहनांच्या ताफ्याला चपला दाखवून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी केले आहे. गत काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान करणारे व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसैनिकांनी राज्यपाल कोश्यारी विरोधात आंदोलन केले आहे.