लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : परिसरात शेंबडी गोगलगाईने उच्छाद मांडला असून, शेतात जमिनीवर आलेले सोयाबीनचे पीक फस्त करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाडेगाव येथील एका शेतकऱ्याचे आठ एकरातील सोयाबीन नष्ट झाले आहे.वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच चालू आहे. ड्राय झोन, चार वर्षांचा दुष्काळ, तर यंदा रबीपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या उच्छादामुळे शेतमाल घरी पडून असणे यामुळे तो मेटाकुटीस आला आहे. त्यानंतर आलेल्या टोळधाडीने झाडांची हिरवी पालवी नष्ट केली. ते संकट जाताच खरिपात सोयाबीनची उगवण झाली नाही. आता शेंबडी गोगलगाय त्याच्या कच्छपी लागली आहे. वाडेगाव येथील दिलीप मारोतराव घाटोळे यांच्या आठ एकर शेतातील सोयाबीन ७ व ८ जुलै या दोन दिवसांत गोगलगार्इंच्या हल्ल्यात निष्पर्ण झाले आहे. ११ जून रोजी त्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनला त्यापूर्वी जोमदार वाढ होती. मात्र, ४८ तासांत गोगलगार्इंनी पिकावर हल्ला चढवून पाने फस्त केली आणि झाडाचा सांगाडा तेवढा शिल्लक ठेवला आहे. आठ एकर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये ७५ हजारांचा लागवड खर्च त्यांनी केला होता. या पिकातून त्यांना तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. ते आता मिळणार नाही आणि पुन्हा पेरणीसाठी अतोनात परिश्रम घ्यावे लागणार आहेत. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर, पंचायत समिती कृषी अधिकारी राजू सावळे यांच्यासह पाच जणांच्या पथकाने शेताची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.ज्या शेतात गोगलगाई आढळून आल्या असतील, त्या शेतात सकाळी स्पिनोसाड १५ लिटर पाण्यात ५ मिलि किंवा थायोडीकार्ब १५ लिटर पाण्यात २५ ग्रॅमची तातडीने फवारणी करावी. जमल्यास सायंकाळी मेटॅल्डिहाईड कीटकनाशकाची धूरळणी करावी.- उज्ज्वल आगरकर,तालुका कृषी अधिकारी, वरूडही कीड (गोगलगाय) बहुधा धरणातून ओलित केल्यास किंवा धरणातील रेतीतून येते. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास डेल्टामेथ्रीन किंवा अल्फामेथ्रीन किंवा क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रीनची फवारणी, तर धुरणी सायंकाळी करणे फायदेशीर ठरते.- श्यामसुंदर ताथोडे, प्राचार्य, स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय
शेंबडी गोगलगाईचा आठ एकरात उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST
वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच चालू आहे. ड्राय झोन, चार वर्षांचा दुष्काळ, तर यंदा रबीपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या उच्छादामुळे शेतमाल घरी पडून असणे यामुळे तो मेटाकुटीस आला आहे. त्यानंतर आलेल्या टोळधाडीने झाडांची हिरवी पालवी नष्ट केली. ते संकट जाताच खरिपात सोयाबीनची उगवण झाली नाही. आता शेंबडी गोगलगाय त्याच्या कच्छपी लागली आहे.
शेंबडी गोगलगाईचा आठ एकरात उच्छाद
ठळक मुद्देसोयाबीन फस्त : पेरणी गेली वाया, वाडेगाव शिवारातील प्रकार