डफरीनमधील घटना : मानसोपचार तज्ज्ञाकडून महिलेची होणार तपासणी, गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले महिलेसह नातेवाईंकांचे बयाणअमरावती : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे डफरीन रुग्णालयात सोमवारी खळबळ उडाली होती. मात्र, अचानक मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ती बाळंतीण जखमी अवस्थेत परतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्या महिलेची मनोरुग्ण चिकित्सकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. अंजनगाव सुर्जी येथील २४ वर्षीय महिलेचे १६ मे रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात सिझेरियन झाले. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाची प्रकृती नाजूक असल्यामुळे एनआयसीयू कक्षात ठेवण्यात आले. सोमवारी सायंकाळी ती महिला अचानक बेपत्ता या घटनेने रुग्णालय प्रशासन हादरले. शहरात खळबळ उडाली. नातेवाईकांनी गाडगेनगर पोलिसांकडे हरविल्याची तक्रार दाखल करुन शोधाशोध सुरू केली. मंगळवारी सायंकाळी ती महिला जखमी अवस्थेत डफरीन रुग्णालयात परत आल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. वैद्यकीय अधीक्षक अरूण राऊत यांनी तिची विचारपूस केली असता स्वेच्छेने बाहेर गेल्याचे तिने सांगितले. गाडगेनगर पोलिसांनाही तिने हेच बयाण देत स्वत:ला जखमा करून घेतल्याचे सांगितले. तिच्या बयाणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आता डफरीन प्रशासनाकडून त्या महिलेची मनोरुग्ण चिकित्सकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत परिचारिकांच्या देखरेखीत ठेवण्यात येणार आहे. या घटनेमुळे डफरीन प्रशासनाला चरखा प्रकरणाची आठवण आली.
'ती' बाळंतीण जखमी अवस्थेत रुग्णालयात परतली
By admin | Updated: May 21, 2015 00:30 IST