अमरावती : येथील ओमश्री सोमेश्वर महाराज शिक्षण संस्थेत मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त डीवायएसपींची सात लाखांनी फसवणूक केल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत घडली. शंकरसिंह अर्जुनसिंह राजपूत (६६, रा. गिरमकर ले-आऊट, विद्यापीठजवळ) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त डीवायएसपींचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संस्था चालकासह तीन जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देवरणकरनगर परिसरातील एका घरामध्ये भाड्याने खोली घेऊन त्या ठिकाणी ‘ओमश्री सोमेश्वर महाराज शिक्षण संस्थे’ची शाखा उघडण्यात आली होती. संस्थाचालकांनी सहायक कार्यकारी अधिकारी पदभरतीसंदर्भात काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहिरातसुध्दा प्रसिध्द केली होती. जाहिरात वाचून सेवानिवृत्त डीवायएसपी शंकरसिंह राजपूत यांनी आपल्या मुलीच्या नोकरीसाठी संस्थेकडे अर्ज दाखल केला होता. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सदर शिक्षण संस्था केंद्र शासन पुरस्कृत असल्याची बतावणी करुन संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजपूत यांच्या मुलीला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी राजपूत यांनी जानेवारी २०१४ मध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ७ लाख १६ हजार रुपये दिले. पैसे भरल्यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट नियुक्तीपत्रसुध्दा राजपूत यांना दिले होते. मात्र, ६ महिने उलटूनही मीनाक्षी राजपूत यांना नोकरीवर रुजू न केल्याने राजपूत हे विचारपूस करण्यास देवरणकर नगरातील संस्थेमध्ये गेले. मात्र, त्या ठिकाणी शुकशुकाट दिसून आला. ज्या ठिकाणी संस्थेने कार्यालय थाटले होते, तेथे काहीही खाणाखुणा आढळून आल्या नाहीत. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची बाब राजपूत यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सोमवारी दुपारी राजापेठ पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्या अनुशंगाने पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. शंकरसिंह राजपूत यांच्या तक्रारीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी आरोपी पराग पाटील ( रा. शिरजगाव कसबा), किरण किंमतकर (संस्था सचिव), संस्थाध्यक्ष व अन्य सदस्यांविरुध्द भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ४०८, १२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी. पुंड यांनी केला. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.
सेवानिवृत्त डीवायएसपींची सात लाखांनी फसवणूक
By admin | Updated: October 28, 2014 22:49 IST