धामणगाव रेल्वे : रमाई, शबरी व ‘ब’ यादीतील लाभार्थींसोबतच लाभार्थींच्या ‘ड’ यादीला मंजूर देऊन वंचित असलेल्या साडेसात हजार लाभार्थींना हक्काचे घरकुल देण्याची प्रक्रिया राबविण्याची मागणी सहकारनेता पंकज गायकवाड यांनी केली आहे.
धामणगाव तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधील रमाई घरकुल योजना, शबरी, घरकुल यांसह ‘ब’ यादीतील घरकुल लाभार्थींना लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये ‘ड’ घरकुलांची यादी प्रलंबित आहे. या वंचितांना घरकुल नसल्यामुळे पावसाळा उन्हाळा उघड्यावर काढावा लागतो. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. विशेष म्हणजे, जिल्हास्तरावर केवळ कागदाच्या ऑनलाइन घरकुलांचा खेळखंडोबा सुरू आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या सर्वसामान्य गरिबांना घरकुल नाही. केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल देण्याचे घोषित केले. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही यादी ही पूर्ण होत नाही. ज्या सामान्य माणसाचे ‘ड’ यादीत नाव नसेल, त्यांची ग्रामसभेत नाव समाविष्ट करून वंचित कुटुंबाची नावे समाविष्ट करावी तसेच जी कुटुंबे रमाई, शबरी घरकुलापासून वंचित आहेत, त्या सर्व कुटुंबांना घरकुल द्यावे, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
-----------------