२८ च्या मेळाव्यात प्रवेश : दोन माजी सभापतींचा समावेशसंदीप मानकर अमरावती दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. २८ जुलै रोजी दर्यापूर येथे आयोजित भाजपाच्या मेळाव्यात बाजार समितीच्या दोन माजी सभापतींसह अनेक बडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश होणार, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यामन खरेदी विक्री संचालक बाळासाहेब वानखडे, बाजार समितीचे माजी सभापती तथा खरेदी विक्रीचे संचालक मदन पाटील बायस्कार या बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकऱ्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. दर्यापूर हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा तालुका आहे. बाजार समितींवर आ.प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या गटाची सत्ता आहे. तर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा आहे. बाजार समितीची व खरेदी विक्री संघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली होती. येथूनच राजकीय समीकरणाला रंग चढला. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता अनेक बड्या नेत्यांचे या निवडणुकीत पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रवेश असल्याची राजकीय वर्तुळात उघड चर्चा होत आहे. दोन वर्षांपासून दर्यापूर तालुक्यात काँगे्रस पक्षामध्ये दोन गट पडले आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे यांचा एक गट, तर बाळासाहेब वानखडे यांचा दुसरा गट मानला जातो. या दोन्हीही काँगे्रसच्या नेत्यांनी बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही वेगवेगळी चूल मांडली होती. येथूनच तालुका काँग्रेसला सुरुंग लागले होते. नेमकी भाजपाने ही संधी हेरली. बाळासाहेब वानखडे हे आ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या गटाचे मानले जायचे. पण आ. देशमुख काँग्रेस सोडून भाजपात गेल्यामुळे येथे राजकीय दृष्ट्या या गटाची ताकद कमी झाली होती. तरीही बाळासाहेब वानखडे यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून आतापर्यंत एकट्याने खिंड लढविली. बाळासाहेबांचे वडील स्व. अण्णाजी हे सहकार नेते व काँग्रसचे ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे तीन तपानंतर काँग्रसला मोठी खिंडार पडणार आहे. त्यामुळे या गटाची येथे पोकळी निर्माण होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. अकोटचे आ. प्रकाश भारसाकळे, आ. सुनील देशमुख, आ. रमेश बुंदिले या भाजपाच्या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रसच्या नेत्यांचे प्रवेश होऊ शकतात. त्यासाठी सर्व नेते कामालाही लागल्याची दर्यापूर तालुक्यात राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
दर्यापुरातील काँगे्रसचे बडे नेते भाजपाच्या वाटेवर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:17 IST