बोर अभयारण्यातून आल्याची नोंद : ट्रॅप कॅमेऱ्यात कैद, जंगल काढले पिंजूनअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिरोडीच्या जंगलात बोर अभयारण्यातून स्थलांतरित वाघ आल्याच्या पार्श्वभूमिवर मुख्य वनसंरक्षकांनी शनिवारी या वाघाच्या शोधार्थ जंगल पिंजून काढला. मात्र, हा स्थलांतरित वाघ वनाधिकाऱ्यांना आढळला नाही. काही महिन्यांपूर्वी पोहरा, मालखेड परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ आल्याचे स्पष्ट झाले आहे. चिरोडीच्या जंगलात बसविण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ दिसून आला. पट्ट्यांवरून तो वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून शिकारीच्या शोधार्थ आल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, वडाळी वनपरिक्षेत्राचे जंगल हे समांतर असून या जंगलात सतत मनुष्यांचा वावर आहे. शिकार मिळत असल्याने हा पट्टेदार वाघ मालखेड, पोहरा या जंगलात रमून गेला आहे. परंतु जंगलात हा वाघ सुरक्षित नसल्यामुळे त्याची काळजी घेण्याच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाने दिल्या आहेत. वनाधिकारी, वनकर्मचाऱ्यांनी पट्टेदार वाघाच्या संरक्षणात कोणतीही कुचराई करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. परिणामी दोन दिवसांपूर्वी अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड हे स्वत: फौजफाटा घेऊन चिरोडीच्या जंगलात पोहोचले होते. या स्थलांतरित पट्टेदार वाघाचे अस्तित्व असलेला परिसर मुख्य वनसंरक्षकांनी पिंजून काढला. मात्र, हा वाघ अधिकाऱ्यांना दिसून आला नाही. यापूर्वी मालखेड, पोहरा जंगलात बसविण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाल्याची बाब शासनाला कळविण्यात आली होती. बोर अभयारण्यातून दोन पट्टेदार वाघ स्थलांतरित झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे दुसरा पट्टेदार वाघही चिरोडी, मालखेड जंगलात असावा, असा कयास आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील या वाघाची काळजी घेण्याचे आदेश एनटीसीएकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मुख्य वनसंरक्षक गौड यांनी चिरोडी जंगलात वाघाचा शोध घेतला. उपवनसंरक्षक नीनू सोमराज यादेखील मालखेड, पोहरा जंगलात फेरफटका मारून वाघाच्या वास्तव्यावर लक्ष ठेवत आहेत, हे विशेष. (प्रतिनिधी)
स्थलांतरित वाघाच्या शोधार्थ सीसीएफ चिरोडीच्या जंगलात
By admin | Updated: October 19, 2015 00:32 IST