अमरावती : समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांकरीता मिळालेल्या निधीतून दीड कोटीचा निधी अखर्चित आहे. त्यामुळे या निधी खर्चास वाढीव मुदत देण्याचा प्रस्ताव समाजकल्याण समितीने पारित केला आहे. याशिवाय वाचनालयाला देण्यात आलेल्या पुस्तक खरेदीमध्येही मोठा घोळ असून याची पुन्हा नव्याने सभापती आणि सदस्यांमार्फत चौकशी करूनच देयके अदा करण्याचा ठरावही सभेत पारित केला आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विषय समिती सभा १५ जुलै रोजी सभापती दयाराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला सदस्य शरद मोहोड, गजानन राठोड, संगीता तायडे, अनिता अडमाते, राजेंद्र जाधवकर व पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी सदस्यांच्या सर्कलमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती सदस्यांना दिली जात नसल्याचा आरोप करून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. समाजकल्याणच्या विविध योजनांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. तसेच वाचनालयाला देण्यात आलेल्या पुस्तक खरेदी घोटाळ्याचा मुद्दा देखील सभेत गाजला. सभापती आणि सदस्यांकडून पुन्हा चौकशी केल्यानंतर देयके अदा करू नयेत असा ठराव समितीने पारित केला आहे.
बॉक्स
असा आहे जमा खर्चाचा हिशेब
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा १ कोटी ५९ लाख ७८ हजार ४०५ रुपयांच्या अखर्चित निधीच्या खर्चाकरीता मान्यता दिली. यात सेफ फंडातील २ कोटी १२ हजार ३१ यामधून १ कोटी १८ लाख १४ हजारांचा खर्च झाला आहे. तर ९४ लाख १६ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला होता. १ कोटी ४१ लाख ९६ हजार रुपयांची तरतूद असताना या वर्षातील ७६ लाख ३४ हजार २२० रुपयांचा निधी वर्षभरात खर्च केला. यामधून ६५ लाख १४ हजारांचा निधी अखर्चित राहिला. त्यामुळे या दोन्ही लेखाशिर्षातील दीड कोटीचा निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यास समाजकल्याण समितीने हिरवी झेंडा दिली आहे.