पान २ ची बॉटम
फोटो पी ०१ चांदूरबाजार
सुमीत हरकूट
चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव अर्डक येथील शेतकऱ्याची जमीन संत्र्याचे उत्पादन घेण्याकरिता योग्य नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र, त्या शेतकऱ्याने परिश्रपूर्वक त्याच जमिनीवर २०० संत्राझाडांचे संगोपन करून दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आणि नागपूर येथील नॅशनल सिट्रस रिसर्च सेंटरच्या संशोधकाचा अंदाज खोटा ठरविला.
माणूस मेहनत व जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो. उपजीविका भागविण्यासाठी खडकाळ जमिनीतसुद्धा हिरवळ बहरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचा प्रत्यय तालुक्यातील शिरजगाव अर्डक येथील गजेंद्र गायकी यांनी जोपासलेली संत्राबाग पाहून येतो. गायकी यांच्याकडे दोन एकरमध्ये २०० संत्रा झाडे आहेत. गजेंद्र हे झाडांची निगा योग्य पद्धतीने राखतात. खत, फवारणी हे वेळोवेळी करतात. तरीसुद्धा झाडांना कीड लागणे, फळांना गळती लागणे, फळांचा आकार छोटा अशा विविध प्रकारच्या समस्या त्यांना या शेतात येत होत्या. त्यांनी याबाबत नागपूर येथील नॅशनल सिट्रस रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांना माहिती दिली. त्यानंतर एनसीआरसीच्या संशोधकांनी या परिसरातील अनेक संत्राउत्पादक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन भेटी दिल्या व झाडांची पाहणी केली.
शिरजगाव अर्डक येथील गजेंद्र गायकी यांच्याकडे असलेल्या झाडांच्या पाहणीसाठी हे शास्त्रज्ञ संत्राबागेत गेले तेव्हा ही जमीन संत्रा पीक घेण्यास योग्य नसून, संपूर्ण झाडे तोडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गायकी यांना धक्काच बसला. मात्र, गजेंद्र गायकी यांनी खचून न जाता जिद्दीने या झाडांचे स्वत:च्या पद्धतीने नियोजन केले. आज या झाडांनी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
स्वत:च केले नियोजन
गायकी यांनी आपल्या बागेत स्वत: संशोधन करीत संत्राबाग फुलविली. विपरित परिस्थितीवर मात करून पिकविलेल्या या बागेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेकांनी अवलोकन केले आहे.
-------------------