प्रभाकर भगोले चांदूररेल्वेश्रीक्षेत्र सावंगा विठोबा यात्रेत शनिवारी हजारो नागरिकांचा जनसागर लोटला होता. कृष्णाजी महाराजांच्या समाधीजवळ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कापूर पेटवून अग्नी देवतेच्या साक्षीने पूजाअर्चा केली. जत्रेत अवधुती संप्रदायातील भजनी मंडळींनी दिवसभर भजनाचा कार्यक्रम सादर केला. सावंग्यात दिवसभर टाळमृदंगाचा गजर सुरु होता. ही यात्रा भुताची यात्रा म्हणून प्रसिध्द असल्याने आजारी रुग्णांनाही येथे आणण्यात आले होते.श्रीकृष्णाजी महाराजांच्या समाधीसमोर ७० फूट उंच लांबीचे खांब असून या खांबावर झेंडे चढविण्याची शेकडो वर्षांची प प्रथा आहे. येथील नांदूरकर यांनी झेंड्याची खोळ नवीन घातली. गर्दीचे स्वरुप पाहता महसूल, पोलीस विभाग व पंचायत समिती व सर्वात व्यवस्थेचे परिश्रम सावंगा विठोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बदलत्या वातावरणाने उन्हाची तीव्रता कमी आढळून आली. विश्वस्त मंडळाने पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने किरकोळ दुकाने लावण्यात आली होती. भाविकांना सांभाळताना विश्वस्त आणि पोलीस विभागाला कसरत करावी लागत होती. यात्रेत कापूर जाळण्याला महत्त्व असल्याने कापूर विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. राज्य परिवहन विभागाने यात्रेत जाण्यासाठी विशेष बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे अध्यक्ष गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष सोनवाल, सचिव रामटेके, बबनराव चौधरी, बेलसरे, चव्हाण, मानकर यांच्यासह नागरिकांनी भाविकांच्या सोयीसाठी परिश्रम घेतले.
सावंगा विठोबा यात्रेत लोटला जनसागर
By admin | Updated: March 22, 2015 01:23 IST