ढगफुटीचा परिणाम, दगड, चिखल, झाडे रस्त्यावर
चिखलदरा (अमरावती) : मेळघाटात २२ जुलै रोजी ढगफुटीप्रमाणे कोसळलेल्या पावसात सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर एकूण दीड किलोमीटर किलोमीटरपर्यंत सातपुड्याचा पहाड कोसळला. यामुळे या रस्त्यावर चिखल, झाडे व दगडांचा खच लागल्याचे शनिवारी सायंकाळी अभियंत्यांच्या पाहणीत पुढे आले.
व्याघ्र प्रकल्पाच्या अंमलाखालील क्षेत्रातून हा रस्ता जातो. या मार्गातील बिच्छुखेडा, माडीझडप या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या एक हजार आहे. खंडू नदीलाही पूर असल्याने दोन्हीकडील मार्ग बंद झाले आहेत. आरोग्य यंत्रणा तिथपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.अर्ध्या किलोमीटरपर्यंत दरड घसरल्याने सोबत सागवान, बांबूची झाडे, मोठे पाषाण रस्त्यावर आले. जेसीबीलाही ते उचलले जाणार नसल्याने ब्लास्टिंग करून रस्ता मोकळा करावा लागणार आहे.