पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : शासकीय जागेवर अतिक्रमणचांदूरबाजार : तालुक्यातील ग्रामपंचायत शिरजगाव बंड येथील शासकीय जागेवर अनधिकृत अतिक्रमण करून एका इसमाने चक्क तेथे बस्तान मांडले आहे. या जागेवरील अतिक्रमण काढण्याकरिता गेलेल्या सरपंच, सचिव यांना अश्लील शिवीगाळ देत मारण्याची धमकी दिली. अखेर यासर्व प्रकाराची ग्रामपंचायत सचिवाने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.शिरजगाव बंड मौजेतील मालमत्ता क्र. ११६३ या जागेवर ग्रामपंचायतीने बोअरवेल केले असून याद्वारे गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. याच जागेत असणाऱ्या चौकीदाराच्या खोलीत पाण्याची मशीन, पाईप, स्टार्टर व इलेक्ट्रिक बॉक्स असे साहित्य ठेवण्यात आले होते. मात्र या जागेत अ. रहीम शे. इस्माईल या इसमाने अनधिकृतपणे अतिक्रमण करून आपले बस्तान मांडले आहे. याची माहिती ग्रामपंचायतीला १२ जून रोजी होताच १३ जून रोजी ग्रामपंचायतीचे सचिव मोरे, सरपंच शिल्पा बेले व ग्रामपंचायत सदस्य पाहणी करण्यासाठी त्याठिकाणी पोहोचले.त्यावेळी सदर जागेवरील बोअरवेल बुजविलेले दिसले तर रुममधील साहित्य दिसून आले नाही तर वॉल कम्पाऊंडवर टिन ठोकत असताना आढळले. याविषयी अतिक्रमणधारक अ. रहीम शे. इस्माईल यास विचारणा केली असता त्याने सर्वांना अश्लील शब्दांत शिवीगाळ केली व मारहाण करण्याची धमकी दिली. यावर अतिक्रमणधारकास समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाद केला असल्याची तक्रार ग्रामपंचायत सचिवाने चांदूरबाजारच्या ठाण्यात केली आहे. हा सर्व प्रकार होत असताना सरपंच शिल्पा बेले यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनासुद्धा अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यात आली व जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपसद्धा भिरकावला. सुदैवाने यातून त्यांचा बचाव झाला. त्यामुळे अ. रहीम शे. इस्माईल या इसमाने शासकीय जागेत अतिक्रमण करून सरकारी साहित्याची नासधूस व चोरी करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अतिक्रमण काढण्यास गेलेल्या सरपंच, सचिवास शिवीगाळ
By admin | Updated: June 22, 2016 00:15 IST