अमरावती : सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी जलसंपदा विभागाच्या सिंचन भवन आयोजित बैठकीत दिले. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत ही बैठक जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु.अ. राठी, भूसंपादन अधिकारी वर्षा पवार, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांच्यासह विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. शेतकरी, गावकरी यांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला संबंधित विभागाकडून प्राधान्याने मिळाला पाहिजे. परंतु, सरळ खरेदी प्रकरणातील काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत मोबदला मिळाला नाही. तशी निवेदनेही जलसंपदा विभागाला प्राप्त झाली आहेत. त्यामुळे यासंबंधी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले.
सरळ खरेदी प्रकरणातील लाभार्थ्यांना कोकण विभागातील अरुणा प्रकल्प, वर्धा प्रकल्प तसेच सोफिया मॉडेलमध्ये ज्याप्रकारे मोबदला अदा करण्यात आला, त्याचा अभ्यास करून व सर्व संदर्भ नमूद करून त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे निर्देश ना. कडू यांनी बैठकीत दिले. येत्या पंधरा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करून कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.