कामगार आयुक्तांचा निर्णय : १० जूनला प्रकरण होणार न्यायप्रविष्ट, किमान वेतन कायद्याच्या उल्लंघनाचा आरोपअमरावती : साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला भरण्याची तयारी शासनाने केली आहे. उत्पन्नाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन देणे, योग्य प्रमाणात सार्वजनिक कार्यावर खर्च न करणे अशा स्वरुपाचे त्यांच्यावर आरोप आहेत. कामगार अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात ही बाब सिद्ध झाली आहे. ट्रस्टच्या संशयास्पद कारभाराबाबत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने विश्वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तथापि, त्यापोटी देण्यात आलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करून कामगार अधिकाऱ्यांनी साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव यांच्याविरुद्ध फौजदारी खटला भरण्याचा निर्णय घेतला. १० जून रोजी कॅम्प येथील न्यायालयात हा खटला भरला जाईल, असे कामगार अधिकारी डी.बी. जाधव यांनी संबंधिताना सूचित केले आहे.साईबाबा मंदिर संस्थानाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्रप्त होते. सार्वजनिक जमिनीवर लॉन, बालोद्यान, मगंल कार्यालय, वाहनपूजा अशा अनेक उपक्रमांतून हे उत्पन्न ट्रस्टच्या तिजोरीत जमा होते. या उत्पन्नाचा उपयोग नियमसंगत पद्धतीने केला जात नाही. कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांनी ९ फेब्रुवारी रोजी अचानक भेट देऊन संस्थानाच्या कारभाराचे निरीक्षण केले. त्यांना त्रुटी आढळून आल्यात. प्रक्रियेनुसार विश्वस्तांना जाब विचारल्यावर ते कामगार अधिकाऱ्यांचे समाधान करू शकले नाहीत. अखेर खटल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आशेचा किरण दिसला आहे, अशी प्रतिक्रिया ट्रस्टचे माजी व्यवस्थापक अविनाश ढगे यांनी व्यक्त केली. ढगे यांनी या प्रकरणाचा चिकाटीने पाठपुरावा केला आहे.विश्वस्तांविरुध्दची कलमेकिमान वेतन अधिनियमानुसार साईबाबा संस्थानकडून विविध कलम व नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. कलम१८(१) व नियम१७(४) किमान वेतन अधिनियम १९४८ व नियम १९६३ अंतर्गत कलम २२(क)नुसार प्रकरण दाखल करण्याची नोटीस रीतसर संस्थानचे अध्यक्ष प्रभाकर देवपुजारी आणि सचिव शरद दातेराव यांना सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने बजावली आहे. साईबाबा संस्थान विश्वस्तांनी किमान वेतन कायद्याचे पालन केले नाही. कमी वेतनात कर्मचाऱ्यांना राबविले. वेतनाचा रेकार्डसुध्दा नीट ठेवण्यात आला नाही. त्यासंबंधाने त्यांना नोटीशी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध १० जून रोजी फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. -डी.बी.जाधव, सरकारी कामगार अधिकारी.या प्रकरणाबद्दल मला परिपूर्ण माहिती नाही. १० जून रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस मिळाली. त्याप्रमाणे आम्ही हजर राहू. या प्रकरणाची चौकशी करुन पुढील निर्णय घेऊ.-प्रभाकर देवपुजारी, अध्यक्ष, साईबाबा मंदिर संस्थान.
साईबाबा ट्रस्ट अध्यक्ष, सचिवांविरुद्ध फौजदारी खटला!
By admin | Updated: June 3, 2015 23:59 IST