इशारा ; पशुसेवा विस्कळीत होण्याची शक्यता
अमरावती : जिल्हा पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेच्यावतीने राज्य कर्मचारी व जिल्हास्तरीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता अखेर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातील पशुचिकित्सक या आंदोलनात सहभागी झाल्याने त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील पशु चिकित्सेवर होण्याची चिन्हे आहे. विविध टप्प्यात हे आंदोलन केले होणार आहे. याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना कामबंद आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
पशुचिकित्सक संघटनेच्या विविध ११ मागण्यांसाठी अनेकदा निवेदने देण्यात आली. ७ जून रोजी पशुसंवर्धन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. केवळ दोन मागण्यांवरच चर्चा करून सभा गुंडाळल्याने संघटना आक्रमक झाली आहे. १५ जूनपासून विविध पातळीवर हे आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम किरकटे यांच्या नेतृत्त्वात आंदोलनाचे बिगूल फुंकण्यात आले. संपूर्ण मागण्या निकाली निघेपर्यंत संघटना मागे हटणार नाही, असा निर्धार डॉ.किरकटे यांनी व्यक्त केला. संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र तराळे, डॉ.रविकिरण सोनार, डॉ.गजानन बाभुळकर, डॉ.प्रवीण शिरसाट, डॉ.विकास गवई, डॉ.गजानन चांदणे, कार्याध्यक्ष डॉ.सदाशिव सातव, सरचिटणीस डॉ.संजय मोरे, कोषाध्यक्ष डॉ.अभिजित कवाणे, डॉ.विनोद वाकोडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आंदोलनाचे नेतृत्त्व करीत असून, बहुसंख्य कर्मचार्यांनी आंदोलनात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिध्दीप्रमुख डॉ.विलास पकडे यांनी केले आहे.
बॉक्स -
तीन टप्प्यात होणार आंदोलन
संघटनेचे हे आंदोलन तीन टप्प्यात होणार असून, त्याअंतर्गत सर्व कर्मचारी शासकीय व्हॉट्स ॲप ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत. सोबतच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना संघटनेची बाजू समजावून सांगणार आहे. त्यानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास कामबंद आंदोलन होईल. १५ जूनपासून लसीकरण व सर्व प्रकारचे ऑनलाईन, मासिक व वार्षिक अहवाल देणे बंद करणार सोबतच आढावा बैठकांनादेखील गैरहजर राहणार आहे.