पोलिसांचा कडक बंदोबस्त : विशेष विमानाने आगमन; ‘प्रबोधन’चे अमृत महोत्सवी वर्षदर्यापूर : स्थानिक प्रबोधन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवार २ फेब्रुवारी रोजी भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात क्रिकेटचा देव आणि युवकांचे ‘आयकॉन’ सचिन तेंडुलकर हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. शेकडो पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सचिन तेंडुलकर यांचे आगमन होईल. प्रबोधन विद्यालयाच्या प्रांगणात यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसह तीन ते चार हजार जणांची बसण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व ठाणेदार जे. के. पवार यांनी सोमवारी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.सचिनच्या हस्ते क्रीडा संकुलाचे भूमिपूजन प्रबोधन विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्व. शुभदाताई वैद्य स्मृती क्रीडा संकुलाचे भूमिपूजनदेखील भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. बेलोरा विमानतळावर आगमनक्रिकेटप्रेमींच्या तसेच समस्त भारतीयांच्या हृदयातील ताईत सचिनच्या आगमनाप्रीत्यर्थ दर्यापूर नगरी सजली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी विशेष विमानाने बेलोरा विमानतळावर सचिन यांचे आगमन होणार असून तेथून कारने ते सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचतील. त्यांच्या समवेत क्रिकेटपटू प्रशांत वैद्य उपस्थित राहतील.१२ अधिकाऱ्यांसह सव्वाशे पोलिसांचा ताफासचिन तेंडूलकर यांच्या आगमनाप्रीत्यर्थ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १२ अधिकारी व १२५ पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. बॉम्बशोधक पथकातर्फे कार्यक्रमस्थळाची तपासणी करण्यात आली. पोलिसांची रंगीत तालीम घेण्यात आली. आगमनापूर्वीपासून ते कार्यक्रमस्थळावरून ते रवाना होईपर्यंत दर्यापूर-मूर्तिजापूर रस्ता बंद राहणार असून वाहतूक साईनगरातून वळविण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी सांगितले.
सचिन तेंडुलकर आज दर्यापुरात
By admin | Updated: February 2, 2016 00:06 IST