(पान २ बॉटम)
वरूड : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात तालुक्यासह आजूबाजूच्या रुग्णांची उपचारार्थ ये-जा असते. येथे प्रसूती, शस्त्रक्रिया, आंतर रुग्ण विभागातील रुग्णांवरील उपचारला अधिकारी, कर्मचारी अल्प असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने चाचणी बंद आहे. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी नागरिकातून होत आहे. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था ढासळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामीण रुग्णालयात २६ पैकी १५ पदे रिक्त, ११ कर्मचारी अधिकऱ्यांवर रुग्णालयाचा डोलारा सुरू आहे.
मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर वरूड तालुका असून बैतुल, छिंदवाडा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्याची सीमा लागून आहे. सातपुडा पर्वताशेजारी अनेक आदिवासी खेडे आहेत. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गसुद्धा जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे असून ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी रुग्णालयात असते. ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूती, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, अपघात, विषप्राशन रुग्ण येत असल्याने अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णावर उपचार करण्यास मोठा ताण पडत आहे. नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने गुणात्मक आरोग्य सेवा देण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे. रिक्त पदांमध्ये सहायक अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, औषधी निर्माता, ''क्ष'' किरण तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक प्रत्येकी १, अधिपरिचारिका ७, कक्ष सेवक ४, कंत्राटी पदांमध्ये अधिपरिचारिका (न्यू बॉर्न स्टॅबिलायझशन युनिट ३, नॉन कॉम्युनल डिसीज, दोन महिला वैद्यकीय अधिकारी (राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम), ३ आरोग्य कर्मचारी, ४ क्षेत्र कर्मचारी अशी पदे रिक्त आहेत. रिक्त पदाबाबत अनेकवेळा मागणी करूनही भरणा करण्यात आला नसल्याने रुग्णसेवेत विलंब होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन अघटित घटनासुद्धा रुग्णालयात घडत आहे. तातडीने रिक्त पदाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जेमतेम कोरोनाचे रुग्ण कमी झाले तर डेल्टाप्ल सने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणा कोमात असल्याचे चित्र आहे. शासनाने यावर मंथन करण्याची वेळ आली आहे.