कावली वसाड : शासनाच्या विविध योजना तथा स्वच्छ भारत अभियानांतर्गत धामणगाव रेल्वे तालुक्यातील हजारो शौचालयाचे बांधकाम केले असले तरी आजही ग्रामीण भागातील नागरिक बाहेर शौचास जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हगणदरीमुक्ती केवळ कागदावरच का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गाव हगणदरीमुक्त झाले असल्याचा मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील स्थिती वेगळी आहे. काही ग्रामपंचायतींनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली. काही दिवस सार्वजनिक शौचालयांची देखभाल करण्यात आली. आता मात्र ते पडक्या अवस्थेला पोहोचले आहेत. काही काळ गुड मॉर्निंग पथकाची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता ती पथके गुंडाळली गेली आहेत.
नवे सदस्य करतील का लोटाबंदी?
दोन महिन्यांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये नव्याने सरपंच, उपसरपंच, सदस्य निवडून आले. आजही सकाळच्या वेळेला ग्रामीण भागात अनेक नागरिक लोटे घेऊन शौचास बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती सुधारण्याचे आव्हान नव्या सदस्य, सरपंचांवर आहे.