धोरण बदलले : परिवहन आयुक्तांचे आदेश धडकलेअमरावती : लर्निंग लायसन्स काढण्यापासून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यापर्यंत व नवीन वाहनाच्या नोंदणीपासून वाहन हस्तांतरणापर्यंत आणि काही बाबींसाठी दहापटीपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीचा धसका सहन करणाऱ्या नागरिकांना आरटीओंच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. केंद्र सरकारने २९ डिसेंबर रोजी केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमातील विविध शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार परिवहन आयुक्तालयाने राज्यातील सर्व आरटीओंना वाढीव दरानुसार शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच ही शुल्कवाढ १९ डिसेंबरपासून लागू झाली असल्याने तेव्हापासून आजपर्यंत आरटीओंनी जुन्या दरानुसार शुल्क आकारणी केली आहे. त्यामुळे या कालावधीतील अनुशेष भरून काढण्याच्या सूचनाही आरटीओंना दिल्याचे समजते. जुन्या दहानुसार सर्व प्रकारच्या वाहनांचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ३० रुपये शुल्क आकारले जात होते. नवीन नियमानुसार ते आता १५० रुपये होणार आहे. लर्निंग लायसन्स फेरपरीक्षेसाठी यापूर्वी शुल्क आकारले जात नव्हते. आता त्यासाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागेल. पक्या लायसन्साठी फेर चाचणी देताना यापुढे ५० रुपयांऐवजी ३०० रुपये मोजावे लाणार आहे. तसेच लायसन्सची वैधता संपल्यानंतर नूतनीकरण करण्यास उशीर झाल्यास पप्रतिवर्ष ५० रुपये दंड आकारला जात होत. त्या दंडाची रक्कम आता एक हजार रुपये करण्यात आली आहे. दरम्यान वाहनावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी वाहनाच्या प्रकारानुसार शंभर रुपयांवरून पाचशे ते तीन हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र तो बोजा उतरवून नवीन नोंदणी पुस्तकासाठी वेगळे शुल्क द्यावे लागणार आहे. स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाढीव शुल्काची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाढीव शुल्काचा बोजा सहन करावा लागणार आहे. आधीच सारथी नामक आरटीओच्या सॉफ्टवेअरवरील बिघाडाने ग्राहकांच्या नाकीनऊ आले आहेत. (प्रतिनिधी)
‘आरटीओ’ची शुल्क दरवाढ
By admin | Updated: January 9, 2017 00:12 IST