अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरताना अनेक पालकांना ओटीपी न येणे या तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ ३० मार्चपर्यंत राहणार आहे. त्यामुळे पालकांना आता प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. सदर मुदतवाढीसंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात १९ मार्च रोजी प्राथमिक शिक्षण संचालकांचे आदेश धडकले आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून ३ ते २१ मार्च दरम्यान पालकांना आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत होती. अशातच पालकांना ११ ते १५ मार्च या दरम्यान अर्ज भरताना तांत्रिक अडचणीचा पालकांना सामना करावा लागला. त्यासंदर्भात अनेक पालक संघटनांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधून अडचणी मांडल्या. या अडचणी शिक्षण विभागाने आता सोडविल्या असल्याचे सांगण्यात आले. आरटीई प्रवेश प्रक्रियेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात २४४ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २,०७६ जागा आहेत. २५ टक्के प्रमाणे राखीव जागांवर प्रवेशाकरिता ४,८९७ पालकांनी शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. अशातच आता ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत ३० मार्चपर्यत वाढविल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पालकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड खान यांनी केले आहे.