मोहीम जोरात : जयस्तंभ, चित्राचौकासह तहसील परिसरात कारवाई, कमाण्डो पाचारण अमरावती: महापालिका प्रशासनाने शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा चंग बांधला आहे.या मालिकेत शनिवारी गाडगेनगर ,जयस्तंभ चौकासह अमरावती तहसील परिसरातील अतिक्रमणावर गजराज फिरविण्यात आला.भर पावसात पोलीस आणि महापालिकेने ही संयुक्त कारवाई केली.या कारवाईने फेरीवाले आणि अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.जयस्तंभ चौकातील योगेश चाट भंडारने सर्व्हिसलाईनमध्ये केलेले अतिक्रमण तोडण्यात आले.या ठिकाणच्या अन्य काही फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.या भागात अतिक्रमण थाटलेल्या अनेकांनी कारवाईचा विरोध केला.विरोधाची धार तीव्र झाल्याने जयस्तंभ चौकात कमांडोना पाचारण करण्यात आले होते.येथे कारवाईचा विरोध करणाऱ्या अशोक लल्लनजी खुरखुरीया या अतिक्रमणधारकांविरुध्द शहर कोतवालीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.त्यांचेविरुध्द कलम ३४१,१८६,५०४,५०६ भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तहसिल कार्यालयालगत असलेले भंगार विक्रेत्त्याचे टिनाचे खोके जप्त करण्यात आले.पंचवटी चौकातील रोशनी स्विट्सने फुटपाथवर बांधलेली भट्टी व अन्य अतिक्रमण तोडण्यात आले.याखेरिज हरदेव रिफ्रेशमेंटने पार्किंगच्या ,रस्त्याच्या जागेवर टिनाचे शेड थाटून केलेले अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले.याशिवाय पंचवटी ते कलेक्टर आॅफीसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्यावरील दुकानानसमोर लावण्यात आलेल्या हातगाड्या उचलत वर्दळीचा रस्ता वाहतुकीेसाठी मोकळा करण्यात आला.महापालिकेचे उपायुक्त विनायक औगड अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यासह या कारवाईत पोलिस पथकानेही सक्रिय सहभाग घेतला. अनेक ठिकाणचे अतिरिक्त बांधकाम गजराज,कुदळ व अन्य साहित्याने पाडण्यात आल्याने अनेकांनी या कारवाईची धास्ती घेतली आहे.
'रोशनी'ला दणका, 'हरदेव'चेही अतिक्रमण काढले
By admin | Updated: July 9, 2016 23:59 IST