अमरावती : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांसह ‘राँगसाईड’ पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालविल्यास अपघाताची शक्यता सर्वाधिक असते. तसेच चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क केल्यास अपघात घडू शकतो. अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यभर राँगसाईड ड्रायव्हिंग व राँगसाईड पार्किंगविरूध्द विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेच्या फ्रेजरपुरा, गाडगेनगर व राजापेठ विभागामध्ये ७ ते १५ आॅक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली. यात चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या ११५४ वाहन धारकांकडून ३ लाखांपेक्षा अधिक तर चुकीच्या दिशेने पार्किंग करणाऱ्या ३४९ प्रकरणांत ३४ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान अवैध वाहतूक प्रकरणात राजापेठ वाहतूक विभागाने ३१०३ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३,५७,४०० रुपये दंड तर गाडगेनगर विभागाने १०१३ वाहनांवर कारवाई करून १,३५,५०० रूपये दंड वसूल केला. या कारवाईत भरधाव वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक, अवैध पार्किंग आदी कारवाईचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वारांना अडविताना अनेकांनी वाहतूक पोलिसांशी अनेकांनी हुज्जत घातली. वाहतूक पोलीस रोशन निसंग (ब.नं. ९४५) यांच्याविरुद्ध गुणवंत हरणे आणि राहुल गेठे या दोघांनी तक्रारसुद्धा केली. हा प्रकार वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घडला. यावेळी पोलिसांनी काहींचे समुपदेशन सुध्दा केले. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
‘राँगसाईड’ वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
By admin | Updated: October 19, 2015 00:38 IST