वरिष्ठ गैरहजर : शाखा अभियंत्याचा लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ !चेतन घोगरे अंजनगाव सुर्जीधरणाचे दरवाजे उघडल्यानंतर होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक गावे पाण्याखाली येतात. शासन प्रशासनासोबत लाखो जीव धोक्यात येत असताना धरणाचे दरवाजे उघडण्याची परिपूर्ण जबाबदारी रोडरोलर ड्रायव्हर तृतीय श्रेणी व ट्रकचा मदतनीस, चतुर्थ श्रेणी सांभाळत आहे. हा सर्व अजबगजब प्रकार शहापूर प्रकल्पावर उघडकीस आला आहे. त्यामुळे नदीच्या परिक्षेत्रात येणाऱ्या लाखो नागरिांच्या जीवाशी येथील शाखा अभियंता खेळ खेळत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून शहानूर धरणाची ओळख आहे. या धरणातून दर्यापूर व अंजनगाव सुर्जी शहरासह दोन्ही तालुक्याला पाणीपुरवठा होतो. यावर्षी चिखलदरा व मेळघाट परिक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाची पाण्याची पातळी ७४.२६ टक्के झाली आहे. २ आॅगस्ट रोजी धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु धरणाचे दरवाजे उघडताना तेथे शाखा अभियंता व स्थापत्य अभियांत्रिक सहायकांची उपस्थिती बंधनकारक असताना आणि त्यांच्या निगराणीमध्ये धरणाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी असताना २ आॅगस्टला शहानूर धरणावरील उपस्थितीत कर्मचारी काळपांडे रोडरोलरचालक तृतीय श्रेणी याने शाखा अभियंता रवींद्र शेगोकार यांच्या दूरध्वनीवरुन आलेल्या आदेशानुसार सकाळी पाच वाजता शहानूर धरणाचे पाच सेंटीमीटर व संध्याकाळी आठ वाजता दहा सेंटीमीटर दरवाजा क्र. १ व ४ उघडून पाण्याचा विसर्ग केला. मात्र यावेळी शाखा अभियंता व त्यांचे सहायक उपस्थित नसल्याने ही अत्यंत महत्त्वाची असलेली जबाबदारी रोड रोलर ड्रायव्हर असलेल्या कर्मचाऱ्याने पार पाडली. यावरून शाखा अभियंता रवींद्र शेगोकार यांना शहानूर नदीच्या परिक्षेत्रातील नागरिकांच्या जीवांची किती काळजी आहे, हे दिसून येते.मध्यम व लघु पाटबंधारे विभागात १ जून ते ३१ आॅक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत एका शाखा अभियंत्याची कर्तव्यावरील जबाबदारी लावली असताना त्याचसोबत स्थापत्य अभियांत्रिक सहायकाची ड्युटी असते आणि आपातकालीन काळात वरिष्ठांच्या आदेशानुसार दरवाजे उघडणे व नदी परिक्षेत्रातील येणाऱ्या तहसीलदार, ठाणेदार, गावाचे सरंच यांना धरणातून पाण्याचा विसर्ग करीत असल्याची माहिती देण्यासारखे महत्त्वपूर्ण काम करावे लागतात. २ आॅगस्टला शाखा अभियंता रवींद्र शेगोकार व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक नाकील यांची कर्तव्यावर असताना त्यावेळी चिखलदरा व मेळघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस येत होता. त्यावेळी शाखा अभियंता आपली जबाबदारी सोडून वैयक्तिक कामात मग्न होते आणि धरणाचे दरवाजे उघडण्याची जबाबदारी एका रोड रोलरचालकाने पार पाडली. यावरून जल लघुसिंचन विभाग किती कर्तव्यदक्ष आहे हे दिसून येते. अशाचप्रकारे पुन्हा एकदा शहानूर धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहानूर धरणावरील दूरध्वनी संच बंदशहानूर धरणावरील अति महत्त्वाच्या काळात व पाणी विसर्गाच्या वेळी तहसीलदार व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमार्फत संपर्क करण्यासाठी दूरध्वनी संचाची आवश्यकता असते. परंतु धरणावरील दूरध्वनी संच बंद असल्याने तेथील कर्मचारी आपल्या वैयक्तिक मोबाईलवरून अधिकाऱ्यांशी संपर्क करतात. पण काही वेळ तेथे मोबाईल नेटवर्क असेलच असे नाही. त्यामुळे महत्त्वाची माहिती देण्यास अडचणी येतात.साहेब कुठे आहे, आम्हाला माहित नाही !याबाबत शहानूर धरणाचे पाणी सोडण्याची सुरक्षेसंदर्भात 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी धरणावर भेट दिली असता यू. एन. क्षीरसागर मोजणीदार, सुभाष रेचे गेट आॅपरेटर, दीपक रेचे चौकीदार, एस. एस. भुयार, डी. डी. सुंभे वायरलेस आॅपरेटर यांना शाखा अभियंता रवींद्र शेगोकार यांच्याबाबत विचारणा केली असता त्यांना साहेब कुठे आहेत हे आम्हाला माहीत नाही. ते आम्हाला दूरध्वनीवरून आदेश देतात व तेच आदेश आम्ही पाळतो, अशी माहिती दिली.शहानूर नदीला पूर, युवक बुडालाशहानूरचे तीन दरवाजे उघडल्याने नदी दुथडी वाहत आहे. त्यातच अनिल नामदेवराव थोरात हा शनिवारी पोहायला गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडाला. स्थानिक मच्छिमारांनी शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अंजनगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाला पाठविला. ज्याला धरणाचे दरवाजे उघडण्याचे प्रशिक्षण दिले तोच दरवाजे उघडू शकतो; महत्त्वाच्या कामानिमित्त वरिष्ठ अधिकारी व शाखा अभियंता मिटींगला जाऊ शकतात. अशावेळी त्या कर्मचाऱ्याने गेट उघडले असेल. - आडे, कार्यकारी अभियंता, अचलपूर लघु व सिंचन पाटबंधारे विभाग.
रोलरचालक उघडतो शहानूरची दारे
By admin | Updated: August 7, 2016 00:12 IST