गर्भश्रीमंतांनी रस्त्यावर उभारल्या इमारती : शासकीय भूखंडांची खासगी व्यक्तींद्वारे विक्री
श्यामकांत पाण्डेय
धारणी : शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणधारकांनी कवेत घेतले आहेत. तलाई कॅम्प, मौजा तलाई येथील शासकीय लेआउटमध्येसुद्धा अतिक्रमण केले जात आहे. स्वत:च्या जागांवर पक्के बांधकाम पूर्ण केल्यानंतर आजूबाजूला असणारे रस्ते व गल्ल्यांवर अतिक्रमण करून रस्ते बंद करण्याचा प्रकार सर्वे नंबर १३२ मध्ये सर्रास सुरू आहे.
धारणी शहरालगत पूर्वेकडे तलाई हे गाव आहे. तलाई रोडच्या पूर्वेकडे गावातील सर्व्हे नंबर १३२ ला प्रारंभ होतो. या सर्व्हे नंबर १३२ मधील ५ हेक्टर ५ आर जमिनीचे भूखंडात अर्थात ले-आउटमध्ये परिवर्तन करण्यात आले. या संपूर्ण भूखंडात जवळपास ६३ प्लॉट पाडण्यात आले आहे. या ले-आऊटचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्लॉटला लागून नऊ मीटरचा रस्ता आहे. येथील भूखंडांची पूर्वी शासकीय दराने अल्प किमतीत विक्री करण्यात आली. यामध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांचा मुख्यत्वे समावेश होता. तदनंतर अनेकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, बळजबरीने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात घेता, तत्कालीन उपविभागीय अधिकारी संजय अग्रवाल यांनी जाता-जाता या ले-आऊटचा जाहीर लिलाव करून विक्री केली. या जाहीर लिलावात अनेक गर्भश्रीमंतांनी मोठ्या प्रमाणात जागा हस्तगत केली. आता या जागांवर जुन्या काळातील प्राध्यापक कॉलनी वगळता इतर जागांवर बांधकाम करताना अनेक गर्भश्रीमंत व सुशिक्षित वर्गाने स्वत:च्या जागेव्यतिरिक्त रस्ते व दुसऱ्याच्या भूखंडावर अतिक्रमण करून टोलेजंग इमारती उभारल्या आहेत.
काळाच्या उदरात दडली गुपिते
ले-आऊटची दुसरी विशेषता अशी आहे की, याची मोजणी उत्तरेकडून दक्षिणेकडे केल्यास शेवटच्या व्यक्तीचे अतिक्रमण दिसते. दक्षिणेकडून उत्तरेकडे मोजताना उत्तरेकडील व्यक्तीचे अतिक्रमण निघते. त्यामुळे हे ले-आऊट आणि याची रचना याबाबत अनेक गुपिते काळाच्या ओघात दडली गेली आहेत. सर्व्हे नंबर १३२ आज केवळ आणि केवळ अतिक्रमणासाठी प्रसिद्ध झाले आहे. तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन पाहणी करण्याची आवश्यकता आहे तसेच सर्व्हे नंबर १३२ चे लेआउट आदेशाप्रमाणे योग्य जागेवर बसविण्याची आवश्यकता आहे.
कोट
सर्व्हे नंबर १३२ हे जुने मंजूर शासकीय ले-आऊट आहे. या ले-आऊटमध्ये होत असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत लवकरच चौकशी केली जाईल. नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
मिताली सेठी, उपविभागीय अधिकारी, धारणी
--------------