पावसाने वाहून गेली खडी : डागडुजी कागदावरचअमरावती : मागील महिन्याभरापासून धुवांधार कोसळत असलेल्या पावसाने शहराची दुरवस्था केली आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी व मुरूम अस्ताव्यस्त झाल्याने खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. अंतर्गत रस्त्यांची तर अक्षरश:चाळणी झाली आहे. पावसाचे पाणी गटारातून कमी आणि रस्त्यांवरुन अधिक वाहात असल्याने रस्ते की गटारे, असा प्रश्न निर्माण होतो.शहरातील झोपडपट्टी, मुस्लिमबहुल परिसरातील गटारे तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची भर पडली आहे. याच घाण पाण्यातून वाट काढताना खड्डे चुकविण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. जिल्ह्यात यंदा जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कायम आहे. या पावसाने रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. नागरिकांची ओरड झाल्यानंतर महापालिकेने काही रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली. मात्र, डागडुजीच्या नावावर खड्डयांमध्ये केवळ खडी आणि बारिक वाळू टाकल्याने ते खड्डे पावसाने पुन्हा जैसे थे झाले आहेत. महापालिकेने बुजविलेले खड्डे अवघ्या दोन दिवसांत उघडे पडले. दोन दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने शहराची दुरवस्था प्रकर्षाने दिसू लागली आहे. दररोज घडताहेत अपघात अमरावती : बेलपुरा, समाधाननगर, अंबानाल्यावरचा भाग, स्मशानभूमी परिसरातील रस्त्यावरचे खड्डे तर अपघाताचे निमंत्रण देणारे ठरले आहेत. खापर्डे बगिचातील रस्त्यांची दुरवस्था एक प्रतिनिधीक ज्वलंत उदाहरण आहे. मातीमिश्रित खड्ड्यांमुळे या भागात रोज एखादा तरी छोटासा अपघात नित्याची बाब बनली आहे. मालवीय चौकात तर अक्षरश: तळे साचते. या भागात रेल्वेच्या कुंपणभिंतीचे काम सुरू असल्याने रस्त्याची गटारगंगा झाली आहे. शहराच्या विविध भागात पावसाच्या पाण्यासमवेत येणारा गाळ नंतर रस्त्यावर पसरल्याने त्याचा घाण वास सहन करण्यापलिकडे नागरिकांच्या हाती काही उरत नाही. कचराकुंड्यांमधील कचरा हलविला गेल्या नसल्याने पावसाने तो ओला होऊन त्याचीही दुर्गंधी शहरात पसरते. पाऊस आणखी काही दिवस बरसत राहिला तर शहराची दैनावस्था अधिक प्रकर्षाने उघड होण्याची चिन्हे आहेत. ही तर नित्याचीच बाब ४दरवर्षी पावसाळ्यात शहराची दैनावस्था होते. पावसाळ्यापूर्वी कामे कागदावर केली जात असल्याने नाले ओव्हरफ्लो होऊन त्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरणे, ही नित्याचीच बाब आहे. यशोदानगर, महादेवखोरी या शिवाय मुस्लिमबहुल परिसरात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहणे, ही देखील नवी बाब नाही. पार्वतीनगर, महादेवनगर, अकोली रोड, छाया कॉलोनी याही परिसरात नाल्याचे पाणी घरात शिरल्याचे प्रसंग ताजे आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यातील खड्डे अमरावतीकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत.
रस्ते की गटारे, खड्डे चुकविण्याची कसरत
By admin | Updated: August 5, 2016 23:59 IST