खाद्यतेलाचे भाव तब्बल दीडशे रुपये प्रतिकिलो झाले आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक डबघाईस आला आहे. सोबतच भाजीपाल्याचे दर वाढल्याने रोजच्या जेवणात भाजीचे नियोजन कसे करावे, या विचारात मात्र गृहिणी अडकल्या आहेत.
ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित तरुण तसेच काही नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या शहरात गेली होती. परंतु कोरोनाव्हायरस ने त्यांना परत गावाकडची वाट दाखवली. त्यामुळे त्यांचा रोजगार हिरावला. गावातही रोजगार मिळणे कठीण झाल्याने आता जगावे कसे, ही मोठी समस्या त्यांना सतावत आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.
एकीकडे कडधान्याचा भाजी म्हणून उपयोग करायचा. परंतु त्याचेही भाव वाढत आहे. चणाडाळ, तूरडाळीसह शेंगदाणा तेल, सोयाबीन तेलाचे दर वाढले आहे. ही भरमसाठ वाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यातच महिनाभरापूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचे दरसुद्धा वाढले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे. सोबतच राजकीय नेतेसुद्धा मोर्चे काढून सरकारला मागणी नियंत्रणात आणण्यासाठी साकडे घालत आहेत. जून महिन्यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने अनेकांनी दुचाकीचा वापर कमी केला आहे. स्वस्त धान्य मोफत मिळत असले तरी तेल, मीठाचा खर्च कसा भागवावा, याची चिंता सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे.