अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रधानमंत्री आवास योजनेसह अन्य योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील १४ तालुक्यांत शासनाकडून घरकुल योजनेचे देण्यात आलेले उद्दिष्ट, सुरू असलेली घरकुलाचे कामे, प्रलंबित कामे आणि अद्याप सुरू न झालेल्या घरकुलाच्या कामांचा विस्तृत आढावा गटविकास अधिकारी यांच्याकडून घेतला. यासोबतच पंडित दीनदयाल योजनेंतर्गत ज्या लाभार्थीकडे जागा नाही, अशा लाभार्थींकडून जागा खरेदीसाठी आलेल्या प्रस्तावांची माहिती घेत, यामधील किती प्रस्ताव मंजूर व किती प्रलंबित, कोणत्या अडचणी आहेत, याची माहिती आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली. प्रशासनाला आलेल्या अडचणींचे निराकरणसुद्धा त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास व अन्य घरकुल योजनांची कामे तातडीने मार्गी लावावी. यात दिरंगाई होता कामा नये, अशा सूचनाही १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार पुढील बैठकीत विस्तृत आढावा घेतला जाणार असून, कामांना गती देण्याचा सल्ला त्यांनी बैठकीत दिला.
घरकुल योजनेचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST