अमरावती : पावसाळ्याच्या दिवसांत उदभवणाऱ्या आजारांविषयी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सोमवारी आढावा घेतला. शहरात त्वरीत साफसफाई, फवारणी व धूरळणी करण्याचे निर्देश आरोग्य व स्वच्छता यंत्रणेला दिले.
डेंग्यू आजारावर प्रतिबंध, उपचार व उपाययोजना यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात गृहभेटीद्वारे जनजागृती करण्यात यावी. ज्या परिसरामध्ये संशयीत डेंग्यू रुग्ण व निश्चित निदान झालेले डेंग्यू रुग्ण आढळून येत आहेत, तेथे त्वरित फवारणी व धूरळणी करण्याचे तसेच डास अळी प्रतिबंधक औषध मारण्याचे निर्देश देण्यात आले. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित महापालिका दवाखाने, शासकीय रुग्णालय वा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन औषधोपचार सुरू करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले. शहरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत एएनएम यांच्यामार्फत गृहभेटी वाढवून गृहभेटी दरम्यान नागरीकांना डेंग्यू आजाराची लक्षणे व घ्यावयाचे दक्षतेबाबत माहिती देण्याबाबत सूचना आयुक्तांनी दिल्या.
बॉक्स
कंटेनरची तपासणी करण्याचे निर्देश
डेंग्युस आळा घालण्याचे दृष्टिकोनातून शहरी आरोग्य केंद्रामार्फत ज्या विभागात ताप रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, त्या विभागात जलद ताप सर्वेक्षण, पाणीसाठ्याची (कंटेनरची) तपासणी, दूषत आढळून आलेले कंटेनर त्वरित रिकामे करुन घेणे, ताप रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीकरिता पाठविणे, जिवशास्त्रीय कार्यक्रमांतर्गत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
बॉक्स
आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा
नागरिकांनी आठवड्यातुन एकवेळा पाण्याची भांडी स्वच्छ करावी. कुलरमधील पाणी काढून टाकावे, साठविलेले पाणी आठवड्यातून एकदा तरी बदलुन कोरडे करावे व स्वच्छ पाणी भरावे, साठणाऱ्या पाण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. जुने टायर, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या बाटल्यांची वस्तूंची लावावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले.